Mohammed Shami SC Notice:
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. संघ निवड अन् निवडसमितीने त्याच्याकडं केलेलं दुर्लक्ष यामुळं चर्चेत होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं त्याला नोटीस पाठवल्यामुळं तो पुन्हा एकदा बातमीचा विषय झाला आहे. मोहम्मद शमीला हसीन जहाँ पोटगी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं नोटीस जारी केली आहे. हसीन जहाँनं सर्वोच्च न्यायालयात पोटगी वाढवून मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. त्या प्रकरणातच मोहम्मद शमीला सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे.
हसीन जहाँनं कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. हसीन जहाँला स्वतःला महिन्याला दीड लाख रूपये पोडगी आणि मुलीला अडीच लाख रूपये मेंटेनन्स खर्च देण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला होता. मात्र हसीन जहाँच्या म्हणण्यानुसार ही रक्कम पुरेशी नाहीये. तिला मिळणारी पोटगीची रक्कम वाढवून मिळावी अशी मागणी करणारी याचिका तिनं सर्वोच्च न्यायालयात केली आहे. दरम्यान, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकार आणि मोहम्मद शमी या दोघांना नोटीस पाठवली आहे.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचे लग्न २०१४ मध्ये झाले होते. २०१८ मध्ये, हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला होता. या दोघांना एक मुलगी आहे.
जुलै महिन्यात हसीन जहाँने शमीवर स्वतःला बदनाम केल्याचा आणि आपल्या विरोधात गुन्हेगारांना कामावर ठेवल्याचा आरोप लावला होता. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने शमीसाठी कठोर शब्दांचा वापर केला होता.
त्या पोस्टमध्ये हसीन जहाँने लिहिले होते की, ती गेल्या सात वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहे आणि आता आपले हक्क मिळवण्यासाठी कायद्याचा आधार घेणार आहे. पुरुषप्रधान समाजाचा फायदा घेऊन तिच्यासोबत अन्याय झाला, पण आता ती कायद्याच्या माध्यमातून आपले जीवन अधिक चांगले बनवू इच्छिते, असे तिने सांगितले. ज्यांनी तिच्यासोबत अन्याय केला, तेच लोक पुढे चालून शमीच्या वाईट काळात त्याला नुकसान पोहोचवू शकतात, असे हसीनचे म्हणणे होते.