टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आज (दि. २९ नोव्‍हेंबर) नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली.  Pudhari News.
स्पोर्ट्स

Mohammed Shami : क्रिकेटपटू मोहम्मद शमीने घेतली भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट; राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधाण

चहलनंतर राजकीय वर्तुळात चर्चेत आलेला शमी ठरला दुसरा क्रिकेटपटू

पुढारी वृत्तसेवा

Mohammed Shami Meets BJP President Nitin Nabin : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आज (दि. २९ नोव्‍हेंबर) नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच शमीने ही भेट घेतल्याने त्याच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे. या भेटीप्रसंगी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष कुंवर बासित अली हेदेखील उपस्थित होते. मात्र, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

राजकीय वर्तुळात चर्चेत आलेला चहलनंतर शमी दुसरा क्रिकेटपटू

गेल्या आठवडाभरात राजकीय वर्तुळात चर्चेत आलेला शमी हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी २१ नोव्हेंबर रोजी लेग-स्पिनर युजवेंद्र चहल याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्याची ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे.

शमीने सप्‍टेंबर महिन्‍यात घेलती होती केंद्रीय मंत्री जयंत चौधरींची भेट

शमीच्या राजकीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात त्याने केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे (RLD) प्रमुख जयंत चौधरी यांची भेट घेतली होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या त्या भेटीनेही राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या. मात्र, अमरोहा येथील क्रीडा सुविधांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानण्यासाठी शमीने ही भेट घेतल्याचे स्पष्टीकरण आरएलडीकडून देण्यात आले होते.

शमीने नुकतेच जाहीर केली होती कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

३६ वर्षीय शमी २०२५ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात (विरुद्ध न्यूझीलंड) भारताकडून शेवटचा खेळला होता. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्या कारकिर्दीत त्याने ६४ कसोटी सामन्यांत २२९ बळी घेतले. २०२३ मधील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC) अंतिम सामना (विरुद्ध ऑस्ट्रेलिया) हा त्याचा अखेरचा कसोटी सामना ठरला.

देशांतर्गत क्रिकेटमध्‍ये शमी करतो बंगालचे प्रतिनिधित्त्‍व

कसोटीतून निवृत्ती घेताना शमीने आपण वनडे क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो बंगालचे, तर आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करतो. आता त्‍याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतल्‍यानंतर त्याच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT