वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला असून मैदानात परतण्यासाठी सज्ज आहे. File Photo
स्पोर्ट्स

मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची घोषणा!

Mohammed Shami : वर्षभरानंतर खेळताना दिसणार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mohammed Shami Comeback : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला असून मैदानात परतण्यासाठी सज्ज आहे. जवळपास वर्षभरानंतर तो व्यावसायिक सामने खेळताना दिसणार आहे. त्याने 19 नोव्हेंबर 2023 रोजी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो एकही देशांतर्गत सामना खेळू शकला नाही. मात्र, आता त्याला रणजी ट्रॉफीमध्ये संधी मिळणार आहे. बुधवारी 13 नोव्हेंबरला तो मैदानात उतरेल. बंगाल क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघासाठी ही आनंदाची बातमी आहे.

शमी बुधवारपासून मध्य प्रदेश विरुद्धच्या रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप सी सामन्यात इंदूरच्या मैदानावर गोलंदाजी करताना दिसणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, ‘भारतीय क्रिकेट आणि बंगाल रणजी ट्रॉफीसाठी ही चांगली गोष्ट आहे की मोहम्मद शमी पुनरागमन करणार आहे. तो बुधवारपासून इंदूरमध्ये यजमान मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात खेळणार आहे. शमीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. आता वर्षभराच्या गॅपनंतर तो मध्य प्रदेशविरुद्ध बंगाल संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल.’

बंगाल क्रिकेट असोसिएशनने पुढे सांगितले की, ‘बंगाल संघात शमीचा समावेश करणे संघासाठी खूप फायदेशीर ठरेल. बंगाल संघ रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.’

बंगालचा संघ सध्या चार सामन्यांनंतर 8 गुण मिळवून आपल्या गटात पाचव्या स्थानावर आहे. शमीला फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे. सलग दोन रणजी सामने खेळून आणि दीर्घ स्पेल टाकून त्याला आपला फिटनेस दाखवावा लागेल. जर तो यात यशस्वी झाला तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील शेवटचे तीन सामने खेळायला मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात तो एकूण आठ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 32.16 च्या सरासरीने 31 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतासाठी 2023 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला

मोहम्मद शमी दुखापतीमुळे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून मैदानाबाहेर आहे. 2023 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली. त्याने एकहाती संघाला अंतिम फेरीत नेले. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र अंतिम फेरीत त्याची जादू चालू शकली नाही. त्या स्पधेत त्याने एकूण 24 विकेट घेतल्या.

कसोटी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक बळी

शमीची गणना भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी 64 टेस्ट मॅचमध्ये 229 विकेट्स, 101 वनडे मॅचमध्ये 195 विकेट्स आणि 23 टी-20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT