पुढारी ऑनलाईन डेस्क : Mohammad Shami : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 19 नोव्हेंबर 2023 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. शमी आयसीसी वनडे विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाच्या बाहेर आहे. 2023 विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा शमी घोट्याच्या दुखापतीनंतरही खेळला आणि तेव्हापासून तो क्रिकेटच्या क्षेत्रापासून दूर राहिला, यादरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली.
न्यूझीलंडविरुद्धच्या बेंगळुरू कसोटी सामन्यानंतर तो सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखेखाली गोलंदाजी करताना दिसला. तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी संघात पुनरागमन करेल असा विश्वास होता. पण त्याला फिटनेस परत मिळवता आला नाही आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी त्याची संघात निवड झाली नाही. तथापि, आता अशा बातम्या येत आहेत की शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करेल अशी माहिती समोर येत आहे.
रिपोर्टनुसार, शमी रणजी ट्रॉफी 2024 मध्ये दोन सामने खेळताना दिसणार आहे. त्यानंतर तो थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. शमी बंगालकडून कर्नाटक आणि मध्य प्रदेशविरुद्ध खेळू शकतो, हे सामने अनुक्रमे 6 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरपासून खेळवले जाणार आहेत. या दोन सामन्यांमध्ये शमी पूर्णपणे फिट राहिल्यास तो थेट ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो.
यापूर्वी, शमीने चाहत्यांची आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) माफी मागितली आहे. त्याने याबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. बोर्डाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शमीच्या परतीची घाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो अद्याप मॅच फिटनेस परत मिळवू शकलेला नाही. शस्त्रक्रियेनंतर शमीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पुनर्वसन पूर्ण केले. पण गुडघ्याला सूज आल्याने त्याची पुनरागमनाची योजना थांबवण्यात आली.
34 वर्षीय शमीने इंस्टाग्रामवर आपल्या ट्रेनिंगचा एक व्हिडीओ पोस्ट करून लवकरच पुनरागमन करणार असल्याचे सांगितले. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तो लिहतो की, ‘मी दिवसेंदिवस माझ्या गोलंदाजीचा फिटनेस सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. सामन्यांच्या तयारीसाठी आणि देशांतर्गत लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यासाठी मी कठोर परिश्रम करत राहीन. मी सर्व क्रिकेट चाहत्यांची आणि बीसीसीआयचीही माफी मागतो. पण लवकरच मी लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यास तयार होत आहे.’