पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan cricket : पाकिस्तानची मागील काही वर्षांमध्ये क्रिकेट खेळात झालेली घसरण हा चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेटपटूमधील मतभेदामुळे खेळाचा दर्जा कमालीचा घसरला आहे. आता पुन्हा एकदा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. आता मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डला पाकिस्तानच्या वनडे संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.
नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजनच पाकिस्तानमध्ये करण्यात आले होते. घराच्या मैदानावर पाकिस्तानच्या संघाने अत्यंत सुमार कामगिरीचे प्रदर्शन केले. साखळी फेरीत स्पर्धेत गारद होण्याची नामुष्की संघावर ओढावली. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने रिझवानची टी-२० कर्णधारपदावरून हकालपट्टी केली. बाबर आझमलाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर योग्य वागणूक न मिळाल्याने रिझवान संतापला आहे. आता त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडे अतिरिक्त अधिकाराची मागणी केली आहे. आपल्याला अधिकार दिले नाही तर राजीनामा देण्याची धमकीही त्याने दिली आहे.असे म्हटले जात आहे की मोहम्मद रिझवान त्याच्याशी आणि बाबरशी वाईट वागणूक मिळाल्याने नाराज आहे. 'टेलिकॉम एशिया स्पोर्ट'च्या वृत्तानुसार, मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम हे दोघेही येत्या काही दिवसांत पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना भेटणार आहेत. यावेळी टी-२० फॉरमॅटच्या संघ निवडीबद्दल चर्चा करणार आहेत. तसेच वनडे कर्णधार म्हणून रिझवानला अधिक अधिकार हवे आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी निवडकर्त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत, न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत तरुणांना प्राधान्य देण्यात आले. रिझवानच्या जागी सलमान आगा यांना कर्णधार बनवण्यात आले आहे.
पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवान सामन्यादरम्यान अंतिम ११ खेळाडूंच्या निवडीमध्ये अधिक अधिकारांची मागणी आहे. आपल्याला हा अधिकार दिला नाही तर वनडे कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यानेम्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये रिझवानला पाच नियमित गोलंदाज हवे होते.त्याची मागणी मान्य न झाल्याने रिझवानने हंगामी मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांच्याशी निवडीबाबत वाद घातल्याची चर्चा होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाचाही शोध घेत आहे. आकिब जावेद यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरीपर्यंत प्रशिक्षकपदाची सूत्रे सांभाळली. सध्या पाकिस्तानी खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेत आहेत. ही स्पर्धा १८ मे पर्यंत चालेल. यानंतर, बांगलादेश संघ पाच टी-२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात येणार आहे.