दुबई : आशिया चषक 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान झालेल्या शेकहँड वादंगावर अजूनही चर्चा सुरूच आहे. यादरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी), आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांच्यातील ताणतणाव आणखी टोकाला पोहोचत असतानाच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने विराट कोहलीबद्दल केलेल्या एका पोस्टने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. मोहम्मद आमीरने यावेळी विराट कोहलीचे कौतुक करत विराट भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व असल्याचे म्हटले आहे.
आमीर आणि विराट कोहली यांचे पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत, हे देखील येथे उल्लेखनीय आहे. यापूर्वी दोन एक दशकांपूर्वीचा इतिहास पाहता, दोन्ही संघांतील अनेक खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांचे उत्तम मित्र असायचे, हे सर्वश्रुत आहे. मात्र, त्यानंतर दोन्ही संघांत प्रचंड ताणतणाव निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर मोहम्मद आमीरने विराटचे केलेले कौतुक लक्षवेधी ठरते आहे. अर्थात, त्याच्या या पोस्टनंतर पाकिस्तानमध्ये मात्र जळफळाट सुरू झाला असून तेथे मोहम्मद आमीरचे जोरदार ट्रोलिंग होत आहे.