अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आता टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या बाबतीत त्याने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे.
एमएलसी 2025 मध्ये पोलार्ड एमआय न्यूयॉर्क संघाकडून खेळत आहे. या हंगामातील त्याच्या संघाचा पहिला सामना टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध झाला. या सामन्यात पोलार्डने 16 चेंडूत 32 धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले. टी-20 क्रिकेटमध्ये पोलार्डने आतापर्यंत 696 सामन्यांमध्ये 13569 धावा केल्या आहेत. तर विराटच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 13543 धावा आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेलचे नाव अव्वल स्थानी आहे. त्याने 463 सामन्यांमध्ये 14562 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ॲलेक्स हेल्स आहे, त्याने 13704 धावा केल्या आहेत. 13571 धावांसह पाकिस्तानचा शोएब मलिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे पोलार्ड आणि विराट कोहली आहेत.
ख्रिस गेल : 14562 धावा (463 सामने)
ॲलेक्स हेल्स : 13704 धावा (497 सामने)
शोएब मलिक : 13571 धावा (557 सामने)
किरॉन पोलार्ड : 13569 धावा (696 सामने)
विराट कोहली : 13543 धावा (414 सामने)
विशेष म्हणजे, किरॉन पोलार्ड जगभरातील बहुतेक टी-20 लीगमध्ये खेळताना दिसतो. तर विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. तो आता टी-20 फॉरमॅटमध्ये फक्त आयपीएलमध्ये खेळतो. जर पोलार्डने पुढच्या सामन्यात फक्त तीन धावा केल्या, तर तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शोएब मलिकलाही मागे टाकेल.