Pudhari
स्पोर्ट्स

ICC Test Rankings : जसप्रीत बुमराहच्या 'वर्चस्वा'ला धक्का, मिचेल स्टार्क कसोटीचा नवा ‘किंग’!, रवींद्र जडेजा नंबर-१ ऑलराउंडर

फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ऋषभ पंतचीही मोठी झेप

पुढारी वृत्तसेवा

ICC Test Rankings : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमधील अव्वल स्थान आता हिरावले गेले आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने बांगलादेशविरुद्धच्या मॅके कसोटीत १० बळी टिपत आयसीसी (ICC) कसोटी गोलंदाजी रँकिंगमध्ये पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावले आहे. या घडामोडीमुळे बुमराह दुसऱ्या, तर न्यूझीलंडचा मॅट हेन्री तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. दुसरीकडे, फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताच्या ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे.

मिचेल स्टार्कची दमदार कामगिरी

३६ वर्षीय मिचेल स्टार्कने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चमकदार कामगिरी करत सामन्यात तब्बल १० फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याच दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने आपल्या १५ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी रँकिंगमध्ये नंबर-१ चे सिंहासन हस्तगत केले आहे. यापूर्वी गतवर्षी ॲशेस मालिकेनंतर तो टॉप-३ मध्ये पोहोचला होता. आता त्याने दोन स्थानांची झेप घेत बुमराह आणि मॅट हेन्रीला मागे टाकले आहे.

फेब्रुवारी २०२४ पासून बुमराहचे होते वर्चस्व

जसप्रीत बुमराहने फेब्रुवारी २०२४ मध्ये पहिल्यांदा कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर सुमारे दोन वर्षे त्याने आपले स्थान कायम ठेवले. मात्र, श्रीलंका आणि भारत यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मालिकेत बुमराह सहभागी झालेला नाही. बुमराहची गैरहजेरी आणि दुसरीकडे स्टार्कचा धुवाधार फॉर्म, यामुळे ताज्या आयसीसी रँकिंगमध्ये हे मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत.

ऋषभ पंत

ऋषभ पंतची टॉप-10 मध्ये धडक

भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने आयसीसी (ICC) कसोटी फलंदाजांच्या अव्वल १० मानांकनात शानदार प्रवेश केला आहे. सहा स्थानांची मोठी झेप घेत पंतने थेट सातवे स्थान पटकावले आहे. गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ३९ आणि ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. या सामन्यात भारतीय संघाने १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पंत आणि कर्णधार शुभमन गिल ७११ गुणांसह संयुक्तपणे सातव्या क्रमांकावर आहेत. या पहिल्या सामन्यात गिलची बॅट मात्र शांत होती. तर दुसरीकडे, सलामीवीर यशस्वी जायसवाल (७०१ गुण) दोन स्थानांनी घसरून ११ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रूक (८७४ गुण) जगातील नंबर-१ कसोटी फलंदाज बनला आहे, तर त्याचाच सहकारी जो रूट (८५० गुण) दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ (८४० गुण) आणि ट्रॅव्हिस हेड (८११ गुण) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत.

रवींद्र जडेजा नंबर-१ ऑलराउंडर

दुसरीकडे, भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (४२८ गुण) कसोटी अष्टपैलूंच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखून आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून अग्रस्थानावर कब्जा करून आहे. अव्वल १० व्यतिरिक्त, इतर कसोटी फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (९ स्थानांची सुधारणा करत २१ व्या), श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा (२ स्थानांची सुधारणा करत २२ व्या), पाकिस्तानचा अब्दुल्ला शफीक (७ स्थानांची सुधारणा करत २७ व्या) आणि भारताच्या के. एल. राहुलने (५ स्थानांची सुधारणा करत ३० व्या) मानांकनात प्रगती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT