स्पोर्ट्स

Mitchell Starc Record : डावखुर्‍या मिचेल स्टार्कचा कसोटीत अनोखा विक्रम, कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा पहिला...

जागतिक क्रिकेटमध्‍ये कपिलच्‍या ४३४ बळींच्‍या विक्रमाशीही बरोबरी

रणजित गायकवाड

डार्विन : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने गुरुवारी (दि. १३) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डावखुरा गोलंदाज म्हणून सर्वाधिक बळी घेण्याचा महापराक्रम स्टार्कने आपल्या नावावर केला आहे. या शानदार कामगिरीसह त्याने श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू रंगना हेराथचा जागतिक विक्रम मोडीत काढला.

दरम्यान, डार्विन येथे खेळल्या जात असलेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव अवघ्या १९८ धावांवर आटोपला. बांगलादेशकडून हसन महमूद याने उत्कृष्ट गोलंदाजी करत ५५ धावांत ६ फलंदाजांना तंबूत धाडले. कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या एखाद्या वेगवान गोलंदाजाने केलेली ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे डावखुरे गोलंदाज

  • ४३४ बळी : मिशेल स्‍टार्क (ऑस्‍ट्रेलिया)

  • ४३३ बळी : रंगना हेराथ (श्रीलंका)

  • ४१४ बळी : वासिम अक्रम (पाकिस्‍तान)

  • ३६२ बळी : डॅनिएल व्‍हेटोरी (न्‍यूझीलंड)

  • ३५५ बळी : चमिंडा वास (श्रीलंका)

  • ३४८ बळी : रवींद्र जडेजा (भारत)

रंगना हेराथचा विक्रम इतिहासजमा

मिचेल स्टार्कने गुरुवारी बांगलादेशचा फलंदाज शादमान इस्लाम याला बाद करत कसोटी क्रिकेटमधील डावखुऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचे माजी दिग्गज फिरकीपटू रंगना हेराथ यांच्या नावावर होता, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत ४३३ कसोटी बळी घेतले होते. स्टार्कला त्यांचा विक्रम मोडण्यासाठी केवळ एका बळीची गरज होती, जी त्याने पहिल्या डावातच पूर्ण केली.

या जागतिक यादीत आता पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम ४१४ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडचे माजी फिरकीपटू डॅनिएल व्हिटोरी (३६२ बळी) चौथ्या, तर श्रीलंकेचे चमिंडा वास (३५५ बळी) पाचव्या स्थानावर आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा ३४८ कसोटी बळींसह या यादीत आघाडीच्या गोलंदाजांमध्ये समाविष्ट आहे.

कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे पहिले ५ गोलंदाज

  • ८०० बळी : मुथय्‍या मुरलीधरन (श्रीलंका)

  • ७०८ बळी : शेन वॉर्न (ऑस्‍ट्रेलिया)

  • ७०४ बळी : जेम्‍स अँडरसन (इंग्‍लंड)

  • ६१९ बळी : अनिल कुंबळे (भारत)

  • ६०४ बळी : स्‍टुअर्ट ब्रॉड (इंग्‍लंड)

हसन महमूदच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची दाणादाण

हसन महमूदच्या (६ बळी) घातक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ५३ षटकांत १९८ धावांवर गुंडाळला. विशेष म्हणजे, तब्बल २३ वर्षांनंतर बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामना खेळत आहे.

फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला जेक वेदरॉल्ड आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने ४५ धावांची सुरुवात करून दिली होती. मात्र, १२ व्या षटकात महमूदने जेक वेदरॉल्डला (२३) बाद करत बांगलादेशला पहिले यश मिळवून दिले. यानंतर बांगलादेशी गोलंदाजांनी सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत केली.

महमूदला दुसऱ्या बाजूने तस्कीन अहमद आणि इबादत हुसेन यांनी उत्तम साथ देत प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यामुळे कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व १० बळी केवळ वेगवान गोलंदाजांनी घेण्याची बांगलादेशची ही इतिहासातील दुसरीच वेळ ठरली. डार्विनमधील ५५ धावांत ६ बळींची कामगिरी ही बांगलादेशी वेगवान गोलंदाजाची कसोटीतील तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी २०२४ मध्ये रावळपिंडी कसोटीतही महमूदने ५ बळी घेण्याची किमया केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT