फोर्डे (नॉर्वे); वृत्तसंस्था : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने नॉर्वेतील फोर्डे येथे सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावत आपला शानदार विक्रम कायम ठेवला आहे.
48 किलो वजनी गटात खेळणार्या चानूने एकूण 199 किलो (स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो) वजन उचलून हे पदक जिंकले. यापूर्वी तिने 2017 मध्ये विश्वविजेतेपद पटकावले होते आणि 2022 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.
31 वर्षीय चानूसाठी स्नॅचची सुरुवात चांगली झाली नाही, कारण 87 किलो वजन उचलण्याच्या तिच्या दोन प्रयत्नांत ती अपयशी ठरली. मात्र, तिने क्लीन अँड जर्कमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करत तीनही प्रयत्न यशस्वी केले. तिने 109 किलो, 112 किलो आणि 115 किलो वजन सहजतेने उचलले. तिने यापूर्वी 2021 च्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये (जेथे तिने रौप्यपदक जिंकले होते) 115 किलो वजन उचलले होते.