India Pakistan T20 World Cup 2026 pudhari photo
स्पोर्ट्स

India Pakistan T20 World Cup 2026: भारतात अन् श्रीलंकेत खेळणं वेगळं... क्लार्कनं दिला इशारा, कोणाला जिंकण्याची जास्त संधी?

Anirudha Sankpal

India Vs Pakistan T20 World Cup 2026: भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघासाठी कोलंबोचं मैदान सज्ज होत आहे. येत्या रविवारी म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हा सामना रंगणार आहे. जरी या सामन्यावर पावसाचं मळभ असलं तरी दोन्ही देशांचे चाहते आणि ब्रॉडकास्टर्स देखील हा सामना व्हावा म्हणून देव पाण्यात घालून बसले आहेत.

भारत पाकिस्तान सामन्याकडे फक्त दोन देशातील लोकांचे नाही तर अख्ख्या जगाचे लक्ष लागलेले असते. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कनं या हाय व्होल्टेज सामन्याबद्दल आपले प्रेडिक्शन समोर ठेवलं आहे. त्याने कोणाचं पारडं जड आहे. कोणाला किती संधी आहे आणि कोण दबावात खेळेल याचा अंदाज बांधला आहे. सहसा क्लार्कचा अंदाज बरोबरच असतो. त्यानं श्रीलंकेतील प्लेइंग कंडिशनबाबत देखील इशारा दिला आहे.

काय म्हणाला क्लार्क?

मायकल क्लार्क Beyond 23 या क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला, 'मी हा सामना भारत जिंकणार असं सांगतोय. मी भारताच्या पारड्यात माझं वजन टाकेन. मला असं वाटतं की पाकिस्तान भारताविरूद्ध खेळण्याचा दबाव सहन करू शकणार नाही. तो गेल्या अनेक काळापासून हा दबाव झेलत आहेत.'

क्लार्क पुढं म्हणाला, 'तसंच पाकिस्तान संघाबाबत काही समस्या देखील आहेत. ते सामना खेळणार की नाही याबाबत बाराच काळ साशंकता होती. अशी साशंकता कोणत्याही संघासाठी फायदेशीर नसते. मला असं वाटतं की या सामन्यात भारत वर्चस्व गाजवणार. ते सध्या त्यांचा सर्वोत्तम खेळ करत आहेत.'

जर भारतानं संधी दिली तर...

पाकिस्तानबद्दल बोलताना क्लार्क म्हणाला, 'पाकिस्तान सध्या त्यांचा सर्वोत्त खेळ करत नाहीये. त्यांना त्यांचा सर्वोत्तम खेळ करण्याची गरज आहे. याचबरोबर भारतानं सामन्यात काही संधी गमावल्या तर पाकिस्तानला विजय मिळवण्याची संधी मिळू शकते. त्यामुळं रविवारच्या सामन्यात भारतच पाकिस्तानला हरवण्याची शक्यता आहे.'

मात्र क्लार्कने भारतात खेळणं आणि श्रीलंकेत खेळणं यात खूप फरक असल्याचं देखील म्हटलं आहे. 'श्रीलंकेत खेळणं हे भारतात खेळण्यापेक्षा खूप वेगळं आहे. इथल्या खेळपट्ट्यांवर चेंडू थोडा जास्त टर्न होतो. तसंच या खेळपट्ट्या संथ देखील असतात. त्यामुळं तुम्हाला इथं फार मोठी धावसंख्या उभारता येणार नाही. माझ्या मते इथं १९० ही धावसंख्या देखील खूप झाली.'

क्लार्क पुढे म्हणाला, 'गेल्या आठवड्यापासून भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बरंच काही बोललं जात होतं. पाकिस्ताननं काही सामने जिंकले आहेत. भारत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हा कायमच एक मोठा सामना राहिला आहे. सध्याच्या घडीला जी काही पब्लिसिटी निर्माण झाली आहे त्यामुळं हा सामना अजूनच मोठा झाला आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून सांगायचं झालं तर सगळीकडे याच सामन्याची चर्चा आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT