जयपूर : इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत सोमवारी (26 मे) पंजाब किंग्जने जयपूरला झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 7 विकेटस्ने पराभूत केले. हा दोन्ही संघांचा प्लेऑफपूर्वीचा अखेरचा साखळी सामना होता. पंजाबने या विजयासह पॉईंटस् टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर उडी मारली. इतकेच नाही, तर त्यांनी पहिल्या दोन क्रमांकामध्येही आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना क्वालिफायनर-1 सामन्याचे तिकीटही पक्के केले. ते आता त्यांच्या घरच्या मैदानात म्हणजेच मुल्लनपूर येथे क्वालिफायर-1 चा सामना खेळताना दिसतील. मात्र, मुंबई इंडियन्सला या पराभवामुळे चौथ्या क्रमांकावरच राहावे लागले आहे. त्यामुळे त्यांना आता आरसीबी किंवा गुजरातविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागेल.
गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकावर राहणारे संघ क्वालिफायर-1 सामना खेळतात. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात जातो, तर पराभूत होणार्या संघाला क्वालिफायर-2 सामना खेळण्याची ‘एक्स्ट्रा’ संधी मिळते. तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर राहणारे संघ एलिमिनेटर सामना खेळतात. या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये पोहोचतो, तर पराभूत होणार्या संघाचे आव्हान संपते.
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग पंजाब किंग्जने 18.3 षटकांत 3 विकेटस् गमावत 187 धावा करून सहज पूर्ण केला. पंजाब किंग्जकडून प्रियांश आर्या आणि जोश इंग्लिस यांनी जोशात फलंदाजी करत अर्धशतके केली.
जयपूरला झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जकडून सलामीला फलंदाजीसाठी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग ही फॉर्ममध्ये असलेली जोडी उतरली. त्यांनी चांगली सुरुवातही करून दिली. प्रभसिमरन संयमी खेळ करत असताना प्रियांशने काही आक्रमक शॉट खेळले, पण पाचव्या षटकात प्रभसिमरनला 16 चेंडूंत 13 धावांवर जसप्रीत बुमराहने बाद केले. त्याचा अफलातून झेल अश्वनी कुमारने घेतला, पण त्यानंतर प्रियांशला जोश इंग्लिसची साथ मिळाली. या दोघांनी मोठे शॉटस् खेळत शतकी भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीने पंजाबला विजयाचा पाया रचून दिला. दोघांनीही अर्धशतके केली. अखेर त्यांची 109 धावांची भागीदारी 15 व्या षटकात मिचेल सँटेनरने तोडली. त्याने सूर्यकुमार यादवच्या हातून प्रियांशला झेलबाद केले. प्रियांशने 35 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारासह 62 धावांची खेळी केली. त्यानंतर जोश इंग्लिसला कर्णधार श्रेयस अय्यरची साथ मिळाली.
तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी 20 षटकांत 7 बाद 184 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. त्याने 39 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह ही खेळी केली. याशिवाय रिकेल्टन (27), रोहित शर्मा (24), कर्णधार हार्दिक पंड्या (26), नमन धीर (20) यांनी छोटेखानी खेळी केल्या.