मुंबई : पाच वेळा विजेतेपद भूषवणारा मुंबई इंडियन्सचा संघ सध्या ‘आयपीएल’मध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. सलग 4 पराभवांमुळे गुणतालिकेत नवव्या स्थानावर फेकल्या गेलेल्या मुंबईसमोर आज (दि. 20) फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. मुंबईला आतापर्यंतची घसरण रोखण्यासाठी येथे सर्वस्व पणाला लावावा लागेल. दुसरीकडे विजयाची हॅट्ट्रिक नोंदवणारा गुजरातचा संघ आपला धडाका कायम ठेवण्यास उत्सुक आहे.
मुंबईसाठी यंदाचा मोसम अत्यंत निराशाजनक ठरत आहे. सलामीचा सामना जिंकल्यानंतर संघाने सलग 4 सामने गमावले आहेत. सूर्यकुमारच्या खेळीत सातत्याचा अभाव आहे, तर तिलक वर्मा पाच डावांत केवळ 43 धावाच करू शकला आहे. रोहित शर्माची दुखापत मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आली आहे.
दुसरीकडे, सुरुवातीचे 2 सामने गमावल्यानंतर गुजरात टायटन्सने सलग 3 विजयांसह सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर या त्रिकुटावर गुजरातची फलंदाजी अवलंबून आहे. गोलंदाजीत सिराज, रबाडा आणि राशीद यांच्यावर गुजरातची भिस्त असेल.
यापूर्वी ‘आयसीसी’ टी-20 विश्वचषकात आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणणारा जसप्रीत बुमराह यंदा ‘आयपीएल’मध्ये मात्र अद्याप विकेटस्च्या निकषावर खातेही उघडू शकलेला नाही. आजच्या लढतीत त्याचा हा बळीचा दुष्काळ संपुष्टात यावा, अशी चाहत्यांची अपेक्षा असेल.