ब्युनोस आयर्स : फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीने इंटर मियामीकडून खेळताना सर्व स्पर्धा मिळून आपला १०० वा गोल नोंदवला. बुधवारी रात्री ‘नू स्टेडियम’वर पार पडलेल्या कॅम्पिओन्स कपच्या अंतिम सामन्यात मेस्सीने केलेल्या शानदार हेडरच्या जोरावर इंटर मियामीने ‘क्रुझ अझुल’चा २-० असा पराभव केला.
विश्वचषक विजेता लिओनेल मेस्सीने इंटर मियामीसाठी केवळ ११५ सामन्यांमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली. कोणत्याही क्लब किंवा देशासाठी सर्वात कमी सामन्यांमध्ये १०० गोल करण्याचा हा त्याचा नवा विक्रम ठरला आहे.
यापूर्वी मेस्सीने बार्सिलोनासाठी १८८ सामन्यांत, तर अर्जेंटिना राष्ट्रीय संघासाठी १७४ सामन्यांत १०० गोलचा टप्पा गाठला होता. २०२३ मध्ये इंटर मियामी संघात सामील झाल्यापासून मेस्सीने मेजर लीग सॉकरमध्ये (एमएलएस) ७६, लीग्स कपमध्ये १४, कॉनकाकॅफ चॅम्पियन्स कपमध्ये आठ आणि फिफा क्लब विश्वचषकात एक गोल नोंदवला आहे.
एमएलएस आणि लीगा एमएक्स यांच्यातील विजेत्या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या वार्षिक सामन्यात मेस्सीने मियामीला सुरुवातीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कासेमिरोने अखेरच्या टप्प्यात हेडरद्वारे दुसरा गोल करत २-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयामुळे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक क्रिस्टियन ‘किली’ गोन्झालेझ यांच्या मार्गदर्शनाखालील पहिल्याच सामन्यात संघाला विजेतेपद मिळाले. प्रशिक्षकपदाच्या पहिल्याच सामन्यात मेस्सीचा १०० वा गोल आणि संघाचे विजेतेपद गोन्झालेझ यांच्यासाठी संस्मरणीय ठरले.