Lionel Messi | मेस्सी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची शक्यता  Pudhari File Photo
स्पोर्ट्स

Lionel Messi | मेस्सी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची शक्यता

केरळमधील बहुप्रतीक्षित मैत्रिपूर्ण सामना

पुढारी वृत्तसेवा

कोची; वृत्तसंस्था : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा संघ नोव्हेंबरमध्ये केरळमध्ये होणार्‍या बहुप्रतीक्षित मैत्रिपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती मंगळवारी राज्याच्या क्रीडा विभागातील अधिकृत सूत्रांनी दिली. या सामन्याची कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान कोचीमध्ये कोणत्याही दिवशी सामना खेळला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

  • सामन्याची अंतिम तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र, नोव्हेंबरमधील दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात आयोजन शक्य

  • अर्जेंटिनाच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य पुढील आठवड्यात कोचीत येणार

  • मैत्रिपूर्ण लढतीनंतर मेस्सी मुंबई, अहमदाबादसह भारतातील काही शहरांना भेटी देण्याची शक्यता

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याचे स्पष्ट संकेत

मैदानाच्या पाहणीसाठी अर्जेंटिनाच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य बुधवारी कोचीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या संघाच्या केरळ दौर्‍याबद्दल काही वाद निर्माण झाले होते. गत महिन्यात अशीही अटकळ होती की, अर्जेंटिनाचा संघ या दौर्‍यावर येणार नाही. मात्र, त्याचवेळी या सर्व अटकळांना पूर्णविराम देत, विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिनाने आपण नोव्हेंबरमध्ये केरळमध्ये फिफा मैत्रिपूर्ण सामना खेळणार असल्याची घोषणा केली होती. राज्याचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमान यांनीही संघाच्या या सामन्यासाठीच्या भेटीची पुष्टी केली होती.

अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनकडूनही दुजोरा

अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर म्हटले होते की, लिओनेल स्कॅलोनीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा राष्ट्रीय संघ 2025 मध्ये उर्वरित दोन फिफा मैत्रिपूर्ण सामने खेळेल. पहिला सामना ऑक्टोबरमध्ये, 6 ते 14 तारखेदरम्यान, अमेरिकेत खेळला जाईल. यातील प्रतिस्पर्धी संघ व शहरे निश्चित होणे बाकी आहे. याशिवाय, आणखी फिफा मैत्रिपूर्ण सामने नोव्हेंबरमध्ये 10 ते 18 तारखेदरम्यान अंगोलातील लुआंडा आणि भारतातील केरळ येथे खेळवले जातील, असेही ‘एएफए’च्या निवेदनात म्हटले होते.

मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाला केरळमध्ये आणण्याचा निर्णय सप्टेंबर 2024 मध्ये चर्चेत आला. अब्दुरहिमान यांनी अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या अधिकार्‍यांची भेट घेण्यासाठी स्पेनचा दौरा केला, त्यावेळी याची प्राथमिक रूपरेषा निश्चित करण्यात आली होती. अर्जेंटिनाने यापूर्वी 2011 मध्ये भारताचा दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएलाचा सामना केला होता.

मेस्सी डिसेंबरमध्ये अनेक शहरांच्या दौर्‍यावर

केरळच्या भेटीनंतर, मेस्सी डिसेंबरमध्ये भारतातील अनेक शहरांच्या दौर्‍यावर जाण्याची शक्यता आहे. यामध्ये कोलकाता, मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली आदी मोठ्या शहरांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याची भेटही यावेळी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT