कोलकाता; वृत्तसेवा : कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर अटकेत असलेले मुख्य आयोजक सताद्रू दत्ता यांनी विशेष तपास पथकासमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मेस्सीला पाठीवर हात लावणे किंवा मिठी मारणे आवडत नसल्याचे त्याच्या सुरक्षा रक्षकांनी आधीच स्पष्ट केले होते. मात्र या नियमांचे उल्लंघन झाल्याने मेस्सी अवघ्या काही मिनिटांत मैदान सोडून निघून गेल्याचे समोर आले आहे.
आर्थिक व्यवहार, पोलिसांचा तपास
मेस्सीच्या या भारत दौर्यासाठी एकूण 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले, ज्यापैकी 89 कोटी रुपये मानधन आणि 11 कोटी रुपये कर म्हणून भरले गेले. सताद्रू दत्ता यांच्या गोठवलेल्या बँक खात्यात 20 कोटींहून अधिक रक्कम आढळली आहे. पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. हजारो चाहत्यांनी महागडी तिकिटे खरेदी केली होती, मात्र मैदानावर झालेल्या गोंधळामुळे त्यांना मेस्सीची झलकही नीट पाहता आली नाही, ज्यामुळे स्टेडियममध्ये तोडफोड झाली होती.