Lionel Messi | फुटबॉलच्या झंझावाताला निरोप! 
स्पोर्ट्स

Lionel Messi | फुटबॉलच्या झंझावाताला निरोप!

पेनल्‍टी, २ असिस्‍टसह मेस्‍सीच्‍या आंतरराष्‍ट्रीय कारकिर्दीची थाटात सांगता

पुढारी वृत्तसेवा

ब्‍युनॉस आयर्स; वृत्तसंस्‍था : २१ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द, त्‍यात १२६ गोल, २०२२ चे वर्ल्ड कप जेतेपद आणि सोबतीला दोन कोपा अमेरिका चषकाने सजलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय कारकिर्दीची मेस्‍सीने अखेर मंगळवारी अगदी थाटात सांगता केली. ८५ हजार प्रेक्षकांच्‍या साक्षीने बेनिनविरुद्ध रंगलेल्‍या सामन्‍यात मेस्‍सीने १ पेनल्‍टीवर गोलजाळ्याचा अचूक वेध घेत तसेच २ निर्णायक असिस्‍ट देत आंतरराष्‍ट्रीय फुटबॉलचा भावुक निरोप घेतला. अर्जेंटिनाने हा सामना ३-० अशा एकतर्फी फरकाने जिंकला.

दोन दशके देशाच्या फुटबॉलचा श्वास बनलेल्या लिओनेल मेस्सीने आपल्या अधिकृत निरोपाच्या सामन्याचे एका दिमाखदार सोहळ्यात रूपांतर केले. येथील मॉन्युमेंटल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्याने १ पेनल्टी आणि २ ‘असिस्ट’ नोंदवत बेनिनविरुद्ध अर्जेंटिनाला ३-० असा विजय मिळवून दिला. उपस्थित ८५,००० चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूला टाळ्यांच्या कडकडाटात अखेरची मानवंदना दिली. यासह मेस्सीच्या २१ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द, १२६ गोल, २०२२ मधील विश्वचषक विजय आणि दोन कोपा अमेरिका विजेतेपदांनी समृद्ध अशा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा समारोप झाला. अनेक भावुक झालेले सहकारी, मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांच्यासह सर्व सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांनी उभे राहून मेस्सीला मानवंदना दिली.

विजयावर उमटवला ठसा

सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला मेस्सीने घेतलेल्या कॉर्नर किकवर बचावपटू निकोलस ओटामेंडीने हेडरद्वारे पहिला गोल मारला. त्यानंतर ६१ व्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर युवा खेळाडू निकोलस पाझने डाव्या पायाने सुरेख गोल करत मेस्सीला मानवंदना दिली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी मेस्सीने स्वतः डाव्या पायाने पेनल्टीचे उत्कृष्ट गोलमध्ये रूपांतर करून अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल नोंदवण्याचा आपला विक्रम आणखी मजबूत केला. संपूर्ण स्टेडियममध्ये यावेळी ‘ओले, ओले, मेस्सी’ अशा घोषणांचा गजर सुरू होता.

अपयशाच्या छायेतून विश्वविजेतेपदाला गवसणी

महान दिएगो माराडोना यांचा वारसदार मानल्या जाणाऱ्या मेस्सीने २००५ मध्ये पदार्पण केले होते. २०२२ पर्यंत विश्‍वचषक जेतेपदाने त्‍याला सातत्‍याने हुलकावणी दिली होती. २०२२ मध्‍ये मात्र त्‍याने ही कसर दृढ निश्‍चयाने भरून काढली.

१० मिनिटे खेळ थांबवला, मेस्‍सीचा सन्‍मान केला, अन खेळ पुन्‍हा सुरू झाला!

भव्य आतषबाजीच्या साक्षीने मेस्सीने अर्जेंटिनासाठी आपला २०८ वा आणि अखेरचा सामना खेळला. या सामन्यासाठी त्याने विशेष डिझाईन केलेली ‘अल्बिसेलेस्टे’ जर्सी परिधान केली होती. या जर्सीवर नेहमीपेक्षा रुंद पट्टे, एक भव्य सूर्य आणि पाठीवर सोनेरी रंगातील ‘१०’ क्रमांक कोरलेला होता. पाठीवर शेळीच्या शिंगांचे छायाचित्रही होते; जे त्याच्या ‘गोट’ (ग्रेटेस्‍ट ऑफ ऑल टाईम) या उपाधीचे प्रतीक होते. सामना सुरू झाल्यानंतर १० व्या मिनिटाला पंचांनी काही वेळ खेळ थांबवून अर्जेंटिनाच्या कर्णधाराचा सन्मान केला. प्रतिस्पर्धी आणि सहकारी खेळाडूंनी पुढे येऊन त्याची भेट घेतली, तर प्रेक्षकांनी उभे राहून अभिवादन केले. मेस्सीनेही हात उंचावून या प्रेमाचा स्वीकार केला.

मेस्सीला मानद डॉक्टरेट प्रदान

मैदानातील निरोप समारंभापूर्वी, ब्युनॉस आयर्स विद्यापीठाने मेस्सीला मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले. एझेइझा येथील राष्ट्रीय संघाच्या सराव संकुलात हा पदवीप्रदान सोहळा पार पडला. राष्ट्रीय संघातील अतुलनीय कामगिरीसह मैदानावर आणि मैदानाबाहेर दाखवलेल्या प्रभावाची दखल घेत या विद्यापीठाने मेस्सीला पदवी आणि पदक देऊन गौरवले.

२० वर्षांहून अधिक काळ ही जर्सी परिधान करणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण राहिला आहे. मी कधीही लढणे सोडले नाही आणि मैदानात नेहमीच सर्वस्व पणाला लावले. मला कायम इथे खेळत राहावेसे वाटत होते; कारण अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणे ही आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे.-
अर्जेंटिनाचा सुपरस्‍टार फुटबॉलर लिओनेल मेस्‍सी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT