मेलबर्न; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या अॅशेस कसोटीसाठी वापरण्यात आलेली मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) येथील खेळपट्टी ‘असमाधानकारक’ असल्याचे जाहीर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्टेडियमला एक डिमेरिट पॉईंट दिला आहे. पंच जेफ क्रो यांच्या अहवालानुसार, खेळपट्टी गोलंदाजांच्या बाजूने झुकलेली होती.
आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयसीसी खेळपट्टी आणि मैदानाचे निरीक्षण प्रक्रियेंतर्गत, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची खेळपट्टी ‘असमाधानकारक’ ठरवण्यात आली असून, स्टेडियमला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. नियमांनुसार, कोणत्याही मैदानावर सहा डिमेरिट पॉईंटस् जमा झाल्यास त्या मैदानावर 12 महिन्यांची बंदी घातली जाऊ शकते.
या खेळपट्टीवर क्रिकेट वर्तुळातून मोठी टीका झाली होती. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ही खेळपट्टी खेळासाठी चांगली नसल्याचे म्हटले होते. या सामन्यात केवळ 142 षटकांत एकूण 36 बळी पडले आणि एकाही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा गाठता आला नव्हता.