FIFA World Cup 2026 | काळजाचा ठोका चुकवत ब्राझील विजयी! 
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 | काळजाचा ठोका चुकवत ब्राझील विजयी!

भरपाई वेळेत शेवटच्‍या मिनिटाला मार्टिनेलीचा निर्णायक गोल

पुढारी वृत्तसेवा

ह्युस्टन (टेक्सास) : वृत्तसंस्‍था : आशियाई वाघ मानल्‍या जाणार्‍या जपानच्‍या जबड्यातून अक्षरश: विजय खेचून आणत ब्राझीलने अगदी शेवटच्‍या क्षणी मार्टिनेलीच्‍या गोलमुळे बाजी मारली आणि या सनसनाटी विजयासह फिफा फुटबॉल विश्‍वचषकाच्‍या उपउपांत्‍यपूर्व फेरीत धडक मारली.

वास्‍तविक, सानोच्‍या गोलमुळे जपानने १-० अशी अनपेक्षित आघाडी घेत ब्राझीलला वर्ल्डकपमधून जणू एक्‍झिटच्‍या दारात उभेच केले होते. मात्र, प्रारंभी कॅसेमिरोने बरोबरीचा गोल केला आणि त्‍यानंतर सामना एक्‍स्‍ट्रा टाईममध्‍ये जाणार, अशी चिन्‍हे असताना मार्टिनेलीने भरपाई वेळेत शेवटच्‍या मिनिटाला गोलजाळ्याचा अचूक वेध घेत ब्राझीलच्‍या सनसनाटी विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

बाद फेरीतील (राऊंड ऑफ ३२) या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पहिल्या हाफअखेर जपानने ब्राझीलविरुद्ध १-० अशी अनपेक्षित आघाडी घेतली. सामन्याच्या २९ व्या मिनिटाला जपानचा मिडफिल्डर काइशू सानो याने ब्राझीलचा कर्णधार डॅनिलोचा पास मध्यभागी अडवला. त्यानंतर त्याने चेंडू वेगाने पुढे नेत बॉक्सच्या बाहेरून एक अचूक आणि ताकदवान लो-स्ट्राईक शॉट मारला. ब्राझीलचा स्टार गोलरक्षक अ‍ॅलिसन बेकरला चकवत हा चेंडू थेट नेटच्या डाव्या कोपऱ्यात गेला आणि जपानला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. दुसर्‍या सत्रात मात्र ब्राझीलच्‍या कॅसेमिरोने गोलजाळ्याचा अचूक वेध घेत प्रारंभी बरोबरी मिळवून दिली तर नंतर निर्णायक क्षणी मार्टिनेलीने सनसनाटी विजयी गोल नोंदवत ब्राझीलचा पुढील फेरीतील प्रवेश सुनिश्‍चित केला.

मार्टिनेलीचा ९५ व्या मिनिटाला विजयी गोल

सामना एक्स्ट्रा टाईममध्ये जाणार असे वाटत असतानाच, ९०+५ व्या मिनिटाला गॅब्रिएल मार्टिनेलीने जपानच्या जाळ्यात चेंडू धाडून ब्राझीलला २-१ अशी सनसनाटी विजय मिळवून दिला. या गोलनंतर ब्राझीलियन चाहत्‍यांनी ह्युस्टन स्टेडियम अक्षरश: डोक्‍यावर घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT