मेलबर्न : पुढारी ऑनलाईन
रशियाची ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोवाला ऑस्ट्रेलियन ओपनमधून महिला एकेरीत पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाच्या डोना वेकिकने मारियाचा ३-६, ४-६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
शारापोवाची या सामन्यात सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या सेटमध्ये ५-१ अशा पिछाडीवर पडली होती. त्यानंतर तिने झुंज देत दोन गेम जिंकले. पण, अखेरीस डोनाने पहिला सेट ६-३ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ३-१ अशी आघाडी घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण, डोनाने पिछाडी भरुन काढत दुसरा सेट ६-४ असा जिंकला.
मारिया शारापोवावर उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी २०१६ ला १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर ती फॉर्म आणि फिटनेस दोन्हीसाठी संघर्ष करत आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीत स्टार खेळाडूची पहिल्याच फेरीत घरवापसी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. काल कोको गौफने व्हिनस विल्यम्सला पहिल्याच फेरीत पराभूत केले होते.