पुढारी ऑनलाईन डेस्क | Malaysia Masters : भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चमकदार कामगिरी करत मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सिंधूने दुसऱ्या फेरीत अटीतटीच्या लढतीत द. कोरियाच्या सिम यू जिनचा तीन गेममध्ये पराभव केला. सिंधूचा यु जिनविरुद्धचा हा तिसरा विजय आहे. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना सुमारे 59 मिनिटे चालला.
सिंधूने सामन्यात संथ सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या गेममध्ये ती 3-7 ने मागे होती. मात्र, सिंधूने शानदार खेळी करत ब्रेकनंतर 21-13 गुणांसह पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. ब्रेकमध्ये यू जिनने 11-10 आणि पुन्हा खेळ सुरू झाल्यावर 12-21 अशी आघाडी घेत दुसरा गेम आपल्या नावावर करत सामना तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये नेला. निर्णायक गेममध्ये यू जिनने पुन्हा एकदा चांगली सुरुवात करत 5-1 अशी आघाडी घेतली. सिंधूने पुनरागमन करत स्कोअर 6-6 ने बरोबरीत आणला. यानंतर तिने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत 13-9 फरकाने मागे असलेल्या सिंधूने सलग गुण मिळवत सामना 21-14 फरकाने जिंकला.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करताना सिंधू अव्वल फॉर्म शोधण्यात अपयशी ठरली आहे. पाचव्या मानांकित सिंधूचा पुढच्या फेरीत अव्वल मानांकित हेन युईशी सामना होणार आहे. हेन युईने गेल्या महिन्यात निंगबो येथे झालेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पराभव केला होता. 2022 मध्ये सिंगापूर ओपनमध्ये यापूर्वीचे विजेतेपद जिंकणाऱ्या सिंधूचा जगातील सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या हेन युईविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. सिंधूने हेन युईविरुद्ध सहापैकी पाच सामने जिंकले आहेत.
इतर लढतींमध्ये, मिश्र दुहेरीत बी सुमित रेड्डी आणि एन सिक्की रेड्डी यांना चेन तांग जी आणि तोह ई वेई या अव्वल मानांकित मलेशियाच्या जोडीकडून 9-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला, तर सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर यांना पर्ली टेनकडून पराभव पत्करावा लागला. आणि थिनाह मुरलीधरनच्या दुसऱ्या सीडेड मलेशियाच्या जोडीविरुद्ध महिला दुहेरीत 17-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला.