पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ज दाखल केला होता. त्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीची चर्चा अधिक रंगली होती. मात्र, मतदानाच्या पूर्वसंध्येलाच अध्यक्षपदाचा तिढा सुटला असून पवार आणि मोहोळ गटाला प्रत्येकी दोन वर्षांचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची 2025-29 ची निवडणूक मुंबई येथे होणार असून त्यासाठी रविवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया होणे अपेक्षित होते. मात्र, त्याच्या पूर्वसंध्येलाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये अजित पवार हे दोन वर्षे तर मुरलीधर मोहोळ हे पुढील दोन वर्षे अध्यक्ष राहणार आहेत. त्याचबरोबर असोसिएशनच्या सरचिटणीस आणि खजिनदार पदाचा तिढा सुटला असून मुरलीधर मोहोळ गटाकडे ही दोन्ही पदे जाणार आहेत. त्याचबरोबर मोहोळ गटाला 11 जागा तर पवार गटाला 10 जागा देण्यात येणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून रविवारी होणार्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून नामदेव शिरगावकर यांनी सरचिटणीस पदासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, हे पद आता मोहोळ गटाकडे जाणार असल्याने त्याठिकाणी संजय शेटे हे नवे सरचिटणीस म्हणून पुढे येणार आहेत. त्यामुळे नामदेव शिरगावकर याबाबत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून समझोत्याचा प्रस्ताव समोर आला होता. त्यानुसार अध्यक्षपदी अजित पवार यांच्यासोबत मुरलीधर मोहोळ यांनाही संधी मिळावी आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील वरिष्ठांकडे मांडला होता. या बैठकीतील निर्णयानंतर ही शिष्टाई फळाला आली असेच म्हणावे लागेल.