सुनील जगताप
पुणे : गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय नोकरीत 5 टक्के आरक्षणाचा लाभ आता अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे मिळणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासाठी ‘ब्लॉकचेन’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली असून, यामुळे खेळाडूंची कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्तता होणार आहे. क्रीडा विभागाने जुन्या कागदपत्रांवर आधारित पडताळणी पद्धत बंद केली असून, आता पूर्णपणे ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे खेळाडूंना पडताळणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत क्रीडा संघटनांना आता स्पर्धा संपल्यानंतर 7 दिवसांच्या आत सर्व निकाल आणि खेळाडूंची यादी ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. जे पदाधिकारी वेळेत माहिती अपलोड करणार नाहीत, त्यांना ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’द्वारे स्वयंचलितपणे डिफॉल्टर घोषित केले जाणार असून, खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संघटनेची असणार आहे.
जेव्हा एखादी माहिती (उदा. खेळाडूचे नाव, स्पर्धेचा निकाल) सिस्टममध्ये भरली जाते, तेव्हा तिचा एक डिजिटल ‘ब्लॉक’ तयार होतो. या ब्लॉकमध्ये त्या माहितीसोबतच एक विशिष्ट ‘हॅश’ कोड असतो. हा कोड म्हणजे त्या माहितीचा ‘डिजिटल ठसा’ असतो. प्रत्येक नवीन ब्लॉक त्याच्या आधीच्या ब्लॉकशी जोडलेला असतो. अशा प्रकारे एक साखळी तयार होते. जर कोणी एका ब्लॉकमधली माहिती बदलण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा ‘हॅश’ कोड बदलतो आणि पुढचे सर्व ब्लॉक्स निकामी ठरतात. यामुळे फसवणूक उघड होते.
संपूर्ण राज्यात पाच टक्के क्रीडा आरक्षणासाठी आता ब्लॉकचेन प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीमुळे खेळाडूंना कागदपत्रांसाठी आणि पडताळणीसाठी होणारा त्रास कमी होईल. खेळाडू स्वतःचे तपशील आणि प्रमाणपत्रे ब्लॉकचेनवर नोंदवू शकतील. भरती प्रक्रियेच्या वेळी, अधिकारी फक्त बारकोड स्कॅन करून प्रमाणपत्राची सत्यता तपासू शकतील, ज्यामुळे पुनर्रिक्षण करण्याची गरज उरणार नाही. त्याचबरोबर क्रीडा संघटनांना त्यांच्या काही शंका असल्यास त्या चर्चेद्वारे सोडवल्या जातील.- सुधीर मोरे (सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय)
अनेकदा खोटे प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ घेण्याचे प्रकार घडतात. ब्लॉकचेनमध्ये एकदा माहिती अपलोड झाली की, ती बदलता येत नाही, त्यामुळे बनावट प्रमाणपत्रांना थारा उरणार नाही.
खेळाडूची कामगिरी आणि संघटनेने दिलेली माहिती यांची पडताळणी सिस्टीम स्वतः करते यात मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे ‘वशिलेबाजी’ चालत नाही.
सध्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी महिने लागतात. ब्लॉकचेनमुळे ही पडताळणी काही सेकंदात होऊ शकते. कारण, डेटा आधीच सुरक्षित आणि व्हेरिफाईड स्वरूपात उपलब्ध असतो.
तुमचे रेकॉर्डस् डिजिटल स्वरूपात आयुष्यभर सुरक्षित राहतात. कागद हरवण्याची किंवा खराब होण्याची भीती नसते.