मकाऊ : भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने मकाऊ ओपन बीडब्ल्यूएफ सुपर 300 स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बुधवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात त्याने चायनीज तैपेईच्या हुआंग यू काई याचा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याचबरोबर, मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनेही विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेतील सातव्या मानांकित आणि जागतिक क्रमवारीत 31 व्या स्थानी असलेल्या आयुष शेट्टीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. त्याने 66 व्या क्रमांकाच्या हुआंग यू काई याच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. अवघ्या 31 मिनिटांतच आयुषने हा सामना 21-10, 21-11 असा जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
मिश्र दुहेरीतही भारतासाठी आनंदाची बातमी मिळाली. पाचव्या मानांकित ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने थायलंडच्या रॅचापोल मक्कासासिथॉर्न आणि नट्टामॉन लायसुआन या जोडीचा 21-10, 21-15 असा सहज पराभव केला. हा सामना त्यांनी फक्त 26 मिनिटांत जिंकून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. मात्र, भारतासाठी दिवस संमिश्र स्वरूपाचा ठरला. पुरुष एकेरीत सतीश कुमार करुणाकरन याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला मलेशियाच्या जस्टिन होहकडून 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. तसेच, मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि रुथविका शिवानी गड्डे या जोडीलाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना चिनी तैपेईच्या वू गुआन झुन आणि ली चिया सिन या जोडीने 20-22, 17-21 असे पराभूत केले.