Lungi Ngidi injury update
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात डोक्याला लागलेल्या गंभीर दुखापतीतून आता सावरला असून तो पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आगामी सामन्यापूर्वी लुंगी नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. दिल्ली आणि राजस्थान यांच्यात १ मे रोजी सामना रंगणार आहे. लुंगी सध्या दिल्लीसाठी उत्कृष्ट कामगिरी करत असून तो संघातील प्रमुख मॅच-विनर खेळाडूंपैकी एक आहे.
दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लुंगी एनगिडी इतर खेळाडूंसोबत सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो पूर्णपणे फिट असून जोमाने गोलंदाजीचा सराव करत आहे.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान लुंगी एनगिडीला गंभीर दुखापत झाली होती. पंजाबच्या डावात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलच्या षटकात प्रियांश आर्याने हवेत शॉट खेळला, जो मिड-ऑफला उभ्या असलेल्या लुंगी एनगिडीच्या दिशेने गेला. चेंडू पकडण्यासाठी लुंगीने मागे धावण्यास सुरुवात केली, मात्र यादरम्यान त्याचा संतुलन बिघडले आणि तो पाठीवर जोरात आदळला. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो मैदानातच पडून राहिला.मैदानावर कोसळल्यानंतर एनगिडीने लगेच आपले डोके धरले आणि तो काही काळ स्तब्ध होता. काही मिनिटे तो मैदानावरच पडून राहिल्याने संघाचे फिजिओ आणि डॉक्टरांनी तातडीने धाव घेतली. प्राथमिक तपासणीनंतर, त्याच्या मानेला आधार देण्यासाठी 'नेक ब्रेस' लावण्यात आला आणि अधिक वैद्यकीय चाचणीसाठी त्याला तातडीने पूसा रोड येथील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले होते.