लखनौने बिघडवले क्वालिफायर-1 चे गणित 
स्पोर्ट्स

GT vs LSG : लखनौने बिघडवले क्वालिफायर-1 चे गणित

गुजरात टायटन्स पराभूत; अव्वल 2 साठी चुरस वाढली

पुढारी वृत्तसेवा

अहमदाबाद : लखनौ सुपर जायंटस्ने इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये गुरुवारी गुजरात टायटन्सला 33 धावांनी पराभूत केले. मिचेल मार्शच्या वादळी शतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंटस्ने 235 धावांचा डोंगर उभा केला. गुजरातच्या सलामीवीरांनी यापूर्वी 200+ हून अधिक धावांचा पाठलाग करून दाखवला होता; परंतु यावेळी ते अपयशी ठरले. गुजरात टायटन्सचा या पराभवामुळे क्वालिफायर-1 मधील प्रवेश लांबणीवर पडला आहे. त्यांना शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (25 मे) विजय मिळवावा लागणार आहे. तसे न झाल्यास पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांना क्वालिफायर-1 मधील जागा पक्की करण्याची संधी मिळाली आहे.

236 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 16 चेंडूंत 21 धावांवर पाचव्या षटकात माघारी परतला. त्यानंतर गिलही 20 चेंडूंत 35 धावांवर आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. अब्दुल समदने अफलातून झेल घेतला. गुजरातने 8 षटकांत 85 धावांवर 2 फलंदाज गमावले. 18 चेंडूंत 33 धावा करणार्‍या जोस बटलरचा त्रिफळा उडवून आकाश सिंगने सहकारी दिग्वेश सिंगचे नोटबुक सेलिब्रेशन केले. मोहम्मद शाहरुख खान व शेफर्न रुदरफोर्ड यांनी 15 षटकांपर्यंत मॅच 165 धावांवर आणली. लखनौच्या 15 षटकांत 159 धावा होत्या. 16 व्या षटकात गुजरातची सेट जोडी तुटली. रुदरफोर्ड 22 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 38 धावांवर झेलबाद झाला आणि शाहरुखसह त्याची 86 धावांची (40 चेंडू) भागीदारी तुटली. शाहरुखनने 22 चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. आयुष बदोनीने शेवटच्या षटकांत दोन विकेटस् घेताना गुजरातला 9 बाद 202 धावांवर रोखून लखनौचा 33 धावांनी विजय पक्का केला. आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्या प्रत्येकी दोन लढती आहेत आणि या दोन्ही लढती जिंकून हे संघ प्रत्येकी 21 गुणांसह क्वालिफायर 1 साठी पात्र ठरतील. गुजरातलाही शेवटचा सासना जिंकून 20 गुणांपर्यंत पोहोचता येईल.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय शुभमन गिलच्या अंगलट आला. खेळपट्टी फलंदाजांना चांगली साथ देत होती. मिचेल मार्श व मार्कराम यांनी लखनौसाठी पाचव्यांदा अर्धशतकी भागीदारी केली. साई किशोरने गुजरातला पहिले यश मिळवून दिले. मार्कराम 24 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 36 धावांवर झेलबाद झाला आणि 91 धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर मार्श व पूरन यांनी 45 चेंडूंत शतकी भागीदारी करताना लखनौला दोनशे धावांच्या नजीक पोहोचवले. पूरननेही 23 चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण करताना यंदाच्या पर्वात लखनौकडून 500+ धावा पूर्ण करणार्‍या दुसर्‍या खेळाडूचा मान पटकावला. 19 व्या षटकात मिचेल मार्शची विकेट घेण्यात गुजरातला यश आले. त्याने 64 चेंडूंत 10 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 117 धावांची वादळी खेळी केली. त्याने निकोलससह 51 चेंडूंत 121 धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने (16 धावा 5 चेंडू) शेवटच्या षटकात सुरेख फटके मारून संघाला 20 षटकांत 2 बाद 235 धावांपर्यंत पोहोचवले. पूरन 27 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकारांसह 56 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त

लखनौ सुपर जायंटस् : 20 षटकांत 2 बाद 235 धावा. (मिचेल मार्श 117, निकोलस पूरन 56. साई किशोर 1/34) गुजरात जायंटस : 20 षटकांत 9 बाद 202 धावा. (शाहरूख खान 57, शे. रूदरफोर्ड 38. आयुष बदोनी 2/4)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT