LSG vs RCB | लखनौचा आरसीबीला धक्का! मिचेल मार्शचे वादळी शतक 
स्पोर्ट्स

LSG vs RCB | लखनौचा आरसीबीला धक्का! मिचेल मार्शचे वादळी शतक

प्रिन्स यादवची भेदक गोलंदाजी

पुढारी वृत्तसेवा

लखनौ; वृत्तसंस्था : सलामीवीर मिचेल मार्शने ठोकलेले तुफानी शतक आणि प्रिन्स यादवच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर लखनौ सुपर जायंटस्ने आरसीबीला पराभवाचा जोरदार झटका दिला. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरापर्यंत चाललेल्या या लढतीत लखनौने निर्धारित 19 षटकांत 3 बाद 209 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात आरसीबीला 6 बाद 203 धावांवर समाधान मानावे लागले.

विजयासाठी 213 धावांचे सुधारित आव्हान असताना प्रत्युत्तरात विराट (0) व बेथेल (4) आल्या पावली बाद झाले आणि तेथूनच आरसीबीच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. कर्णधार रजत पाटीदार (31 चेंडूंत 61) व देवदत्त पडिक्कल (34) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, यावर बर्‍याच मर्यादा राहिल्या. त्यानंतर जितेश शर्माही केवळ एकाच धावेवर बाद झाल्याने आरसीबीला आणखी एक धक्का बसला.

मिशेल मार्शची चौफेर फटकेबाजी

प्रारंभी, मार्श व कर्णधार ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर लखनौने 209 धावांचा डोंगर उभा केला. तब्बल तीन वेळा पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळाचा सुमारे एक तास वाया गेला. परिणामी, सामना 19 षटकांचा करण्यात आला. मात्र, मार्शने 56 चेंडूंत 111 धावांची खेळी साकारत लखनौला जोरदार वर्चस्व प्राप्त करून दिले. मार्शने अर्शिन कुलकर्णीसोबत (17) 95 धावांची सलामी देत लखनौला स्फोटक सुरुवात करून दिली. त्यानंतर निकोलस पूरनसोबत (38) 70 धावांची भागीदारी करत डाव सावरला.

मार्शचे 20 चेंडूंत अर्धशतक, 49 चेंडूंत शतक!

मार्शने अवघ्या 20 चेंडूंत आपले आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले आणि तोच धडाका कायम ठेवत 49 चेंडूंत शतकही साजरे केले. लखनौतर्फे हा सर्वोच्च विक्रम ठरला. मार्श बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने 10 चेंडूंत 32 धावांची नाबाद खेळी करत लखनौला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. त्याने आपल्या छोटेखानी खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार फटकावले.

पंतचा निर्णय ठरला गेमचेंजर

शेवटच्या षटकात 20 धावांची गरज असताना ऋषभने पार्ट टायमर दिग्वेश राठीकडे चेंडू सोपवला आणि हा निर्णय सहज विजय मिळवून देणारा ठरला. राठीने नियंत्रित टप्प्यावर मारा करत आरसीबीचे इरादे धुळीस मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT