मिचेल मार्श  ANI photo
स्पोर्ट्स

LSG vs MI : लखनौचा ‘सुपर’ विजय

मुंबई इंडियन्स पराभूत; गोलंदाजी फसली, फलंदाजी ढेपाळली

पुढारी वृत्तसेवा

लखनौ : लखनौ सुपर जायंटस्ने घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवला. लखनौची आधी धडाकेबाज फलंदाजी आणि मोक्याच्या क्षणी टिच्चून गोलंदाजी यामुळे लखनौ संघाने बाजी मारली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्श (60) आणि एडन मार्कराम (53) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 8 बाद 203 धावा केल्या. त्याचा पाठलाग करणारा मुंबईचा संघ 5 बाद 191 धावाच करू शकला. सूर्यकुमार वगळता मुंबईच्या फलंदाजांनी अवसानघातकी फलंदाजी केली. तिलक वर्माच्या 23 चेंडूंत 25 धावा हे मुंबईच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.

शनिवारी लखनौच्या वाजपेयी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौच्या द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. विल जॅक्स (5) आणि रायन रिकेल्टन (10) हे स्वस्तात बाद झाले; परंतु त्यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी मोर्चा सांभाळला. नमनने नमनाला घडाभर तेल न जाळता फटकेबाजी सुरू केली. त्यामुळे धावफलक हालता राहिला. दोघांनी 25 चेंडूंत 50 धावा जोडल्या. अर्धशतकासमीप आलेला नमनचा धीर सुटला आणि तो 46 धावांवर बाद झाला. दिव्यांश राठीने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर सूर्याला साथ देण्यासाठी तिलक वर्मा आला. दरम्यान, सूर्यकुमारने 31 चेंडूंत पन्नाशी गाठली. परंतु आवेश खानला षटकार मारायच्या प्रयत्नात उडालेला झेल अब्दुल समदने पकडला. सूर्याने 43 चेंडूंत 67 धावा करताना 9 चौकार, एक षटकार ठोकला. यावेळी मुंबईला शेवटच्या चार षटकांत 52 धावा हव्या होत्या.

हार्दिक आणि तिलक वर्मा यांनी पुढील दोन षटकांत 23 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या 12 चेंडूंत 29 धावांचे लक्ष्य मुंबईला उरले. सामन्यात नेहमी निर्णायक ठरणारे 19 वे षटक टाकण्याची जबाबदारी शार्दूल ठाकूरवर आली, त्याने टिच्चून गोलंदाजी करताना फक्त 7 धावा दिल्या. दरम्यान, तिलक वर्माला बाहेर बोलावून मिचेल सँटेनरला पाठवण्यात आले. मुंबईला शेवटच्या 6 चेंडूंत 22 धावांची गरज असताना आवेश खानच्या पहिल्या चेंडूवर षटकार बसला; परंतु पुढच्या पाच चेंडूंत त्याने फक्त 3 धावा देत लखनौला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून गवत असलेल्या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय हार्दिक पंड्याने घेतला. मार्शने तुफान फटकेबाजी केली. पॉवर प्लेमध्ये त्याने पॉवर दाखवताना 31 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 60 धावांची वादळी खेळी केली. मार्शला रोखण्यासाठी डगआऊटमध्ये बसलेल्या रोहित शर्माने चेंडूचा वेग कमी करण्यास गोलंदाजांना सांगितले. दुखापतीमुळे रोहित सामन्याला मुकला; परंतु त्याच्या आयडियाने मुंबईला विकेटस् मिळाल्या. विग्नेश पुथूरने त्याच्या पहिल्याच षटकात मार्शला कॉट अँड बोल्ड केले. त्यानंतर हार्दिक पंड्याने स्लोव्हर बाऊन्सरवर निकोलस पूरनला (12) झेलबाद करून माघारी पाठवले. कर्णधार ऋषभ पंत हार्दिकच्या संथ चेंडूवर (2) झेलबाद झाला. मालक संजीव गोयंका पुन्हा एकदा निराश दिसले. आयुष बदोनीने पुन्हा एकदा महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने 19 चेंडूंत 4 चौकारांसह 30 धावांची खेळी केली. एडन मार्करामने संयमी खेळ करताना 38 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. हार्दिकने या सामन्यातील तिसरी विकेट घेताना मार्करामला बाद केले. ट्रेंट बोल्टने स्लो चेंडू टाकून अब्दुल समदला (5) स्वस्तात बाद केले. डेव्हिड मिलर 27 धावांवर बाद झाला. हार्दिकने सामन्यात पाच विकेटस् पूर्ण केल्या आणि लखनौला 8 बाद 203 धावांवर रोखले.

संक्षिप्त धावफलक

लखनौ सुपर जायंटस् : 20 षटकांत 8 बाद 203 धावा. (मिचेल मार्श 60, एडन मार्कराम 53. हार्दिक पंड्या 5/36.)

मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 5 बाद 191 धावा. (सूर्यकुमार यादव 67, नमन धीर 46. दिग्वेश राठी 1/21)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT