lsg major setback after ipl auction 8.6 crore player withdraws his name
मुंबई : आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनचा धडाका संपला असला तरी, चर्चा मात्र अजूनही सुरूच आहे. लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, पण आता फ्रँचायझींच्या डोकेदुखीत वाढ करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाने ज्या ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाजासाठी ८.६ कोटी रुपये मोजले, तो जोस इंग्लिश (Josh Inglis) आता आगामी हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे.
लिलावात जोस इंग्लिशला खरेदी करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात जबरदस्त 'बिडिंग वॉर' पाहायला मिळाले. अखेर ८.६ कोटींची मोठी रक्कम मोजून लखनऊने बाजी मारली. पण ही आनंदाची बातमी फार काळ टिकली नाही. जोस इंग्लिशने स्वतः स्पष्ट केले आहे की, तो आयपीएल २०२६ च्या पूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसेल.
क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी करण्याऐवजी जोस इंग्लिश एप्रिल महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. इंग्लिशने 'एबीसी स्पोर्ट'शी बोलताना सांगितले की, ‘माझं लग्न एप्रिलच्या सुरुवातीला आहे, त्यामुळे मी आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात खेळू शकणार नाही.’
आयपीएल २०२६ चा थरार २६ मार्चपासून सुरू होणार असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे. अशा परिस्थितीत एप्रिलमधील लग्नामुळे लखनऊला आपल्या या महागड्या खेळाडूशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.
जोस इंग्लिश पुढे म्हणाला, ‘लिलावावेळी जेव्हा माझं नाव अनसोल्ड लिस्टमध्ये आलं, तेव्हा मी विचार केला की आता झोपून जावं. पण सकाळी उठल्यावर ही आनंदाची बातमी मिळाली.’
जोस इंग्लिश हा टी-२० फॉरमॅटमधील एक घातक फलंदाज मानला जातो. २०२५ च्या हंगामात त्याने पंजाब किंग्सकडून खेळताना आपली चुणूक दाखवली होती. त्याने गेल्या हंगामात ११ डावात ३०.८८ च्या सरासरीने आणि १६२.५७ च्या स्ट्राईक रेटने २७८ धावा. मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या ४२ चेंडूत ७३ धावा ठोकून त्याने पंजाबला विजय मिळवून दिला होता. ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या इंग्लिशने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत २ शतकेही झळकावली आहेत.
लिलावात एकूण ६ खेळाडू खरेदी करणाऱ्या लखनऊ संघाला आता जोस इंग्लिशच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनचे समीकरण जुळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. मधल्या फळीत आणि यष्टीरक्षणाच्या भूमिकेत इंग्लिश फिट बसत होता, पण आता त्याच्या गैरहजेरीत लखनऊ कोणाला संधी देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.