स्पोर्ट्स

Olympics 2028 मध्ये क्रिकेटचे सामने कुठे खेळवले जाणार? वेन्यूबाबत ICCची मोठी घोषणा

LA Olympics Cricket : 128 वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : 128 वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. यासाठी अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियातील पोमोना शहरात एक विशेष तात्पुरते स्टेडियम बांधले जाईल, जेथे या खेळाचे सर्व सामने खेळले जातील. एलए 2028 ऑलिंपिक आयोजन समितीने मंगळवारी (दि. 15) याची घोषणा केली. या ठिकाणाला 'फेअरप्लेक्स' असे म्हणतात, जे 500 एकरमध्ये पसरलेले आहे आणि 1922 पासून लॉस एंजेलिस काउंटी फेअरचे आयोजन करत आहे. (Los Angeles Olympics Cricket match ground)

2028 चे ऑलिंपिक 14 जुलै ते 30 जुलै दरम्यान रंगणार

लॉस एंजेलिस येथे 14 जुलै ते 30 जुलै 2028 दरम्यान ऑलिंपिक स्पर्धा रंगणार आहे. 1900 नंतर पहिल्यांदाच क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत क्रिकेटचे सर्व सामने हे रोमांचक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवले जातील. यामुळे जगभरातील नवीन प्रेक्षक या खेळाकडे आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे.

पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी 6-6 संघ सहभागी होतील

एलए 2028 ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी 6-6 संघ खेळतील. यासाठी क्रिकेटला 90 खेळाडूंचा कोटा मिळाला आहे, म्हणजेच प्रत्येक संघ हा 15 खेळाडूंचा असेल. तथापि, या स्पर्धेसाठीची पात्रता अद्याप जाहीर केलेली नाही.

ICCचे अध्यक्ष जय शाह यांनी दिली प्रतिक्रिया..

जय शाह म्हणाले, ‘ऑलिंपिकमध्ये क्रिकेटच्या सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा केली आहे, याचे आम्ही स्वागत करतो. ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे शानदार कमबॅक होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. क्रिकेट हा खूप लोकप्रिय खेळ आहे. ऑलिंपिकसारख्या मंचावर टी-20 स्वरूपात खेळणे ही नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची एक उत्तम संधी असेल.’

पॅरिस 1900 ऑलिम्पिकमध्ये खेळला गेला एकमेव क्रिकेट सामना

1900 साली पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत 19 क्रीडा खेळात 95 इव्हेंट्स झाले होते. यात 997 जणांनी (975 पुरुष आणि 22 महिला) सहभाग घेतला होता. क्रिकेटमध्ये तेव्हा चार देशांनी सहभाग घेतला होता. यात ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड आणि बेल्जियम यांचा समावेश होता. या चार देशात नॉकआउट फेरी नियोजित होती आणि त्यानंतर अंतिम मॅच खेळवली जाणार होती.

मात्र, ऑलिम्पिक सुरू होण्याआधी नेदरलँड आणि बेल्जियम या देशांनी माघार घेतल्याने स्पर्धेत फक्त दोनच संघ शिल्लक राहिले. यामुळे कांस्यपदकाची मॅच झाली नाही. एकच मॅच खेळवण्यात आली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील तो एकमेव सामना ठरला होता. तेव्हा वनडे क्रिकेटचा उदय झाला नव्हता फक्त कसोटी क्रिकेट अस्तित्वात होते. त्यामुळे त्या ऑलिम्पिकमध्ये दोन दिवसांचा सामना खेळवण्यात आला. तो सामना व्हेलोद्रोम दे व्हिन्सेनेस येथे 19 आणि 20 ऑगस्ट या दोन दिवसांत पार पडला.

विशेष म्हणजे या सामन्यासाठी नाणेफेक झाली नव्हती. ग्रेट ब्रिटनने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांनी पहिल्या डावात 117 धावा केल्या. प्रत्युत्तरात फ्रान्सचा संघ 78 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात ब्रिटनने 5 बाद 145 धावा केल्या. त्यांनी फ्रान्सपुढे विजयासाठी 185 धावांचे आव्हान दिले. दुसऱ्या डावात फ्रान्सचा फक्त 26 धावांवर डाव संपुष्ठात आला. अशाप्रकारे ब्रिटनने 158 धावांनी विजय साकारत ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव सुवर्णपदक पटकावले. तर पराबूत फ्रान्स संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिसरा संघच नसल्याने कांसपदक कोणालच मिळाले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT