Lionel Messi Mumbai visit
मुंबई : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीची मोठी क्रेझ आहे, याची प्रचिती वानखेडे स्टेडियमवर आली. ‘गोट’ इंडिया टूर अंतर्गत अर्जेंटिनाचा खेळाडू मेस्सी हा रविवारी मुंबईत आला. यावेळी सेलिब्रिटींसह निवडक लहान मुलांसोबत फुटबॉल खेळण्यासह संपूर्ण मैदानात फेरफटका मारून चाहत्यांना विनम्र अभिवादन करत मेस्सीने मुंबईकरांची मने जिंकली.
सायंकाळी 5.50 वाजता मेस्सीचे मैदानावर आगमन झाले. यावेळी त्याच्यासोबत त्याच्यासोबत अर्जेंटिना संघातील लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल होते. दिग्गज फुटबॉल स्टार्सच्या आगमनानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मेस्सीने सुरुवातीला सेलिब्रिटी सामन्यात भाग घेतला. त्यानंतर प्रोजेŠट महादेव अंतर्गत निवडलेल्या 30 मुले आणि 30 मुलींना फुटबॉल मार्गदर्शन केले. तसेच हलकासा किकअबाऊट शेअर केला.
मेस्सीसोबत खेळायला मिळण्यासह त्यांचे फुटबॉल कौशल्य सादर करण्याचा मोठा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सहभागी मुलांचे कौशल्य पाहून मेस्सीसह अर्जेंटिनाचे अन्य खेळाडू अवाक झाले. त्याने खेळाडूंची प्रशंसा केली. मुलांसोबत खेळत असताना या महान फुटबॉलरने स्टेडियमवर उपस्थित चाहत्यांकडे मोर्चा वळवला.
मेस्सीने त्यांना अभिवादन करताना फ्री-किकने चेंडू मारण्याची इच्छाही पूर्ण केली. त्याने मारलेला चेंडू पकडण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. मेस्सीच्या दोन फ्री-किक सचिन तेंडुलकर स्टँडच्या अप्पर स्टँडमध्ये पोहोचले. छेत्री तसेच सुआरेझ आणि डी पॉलने काही चेंडू स्टँडमध्ये मारत प्रेक्षकांना खुश केले. मेस्सी याला ‘याचि देही याचि डोळा’ पाहतानाच त्याच्या विनम्रतेने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात मेस्सी याच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रोजेŠट महादेवा या फुटबॉल प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन केले. राज्यातील तळागाळातील फुटबॉलसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमामुळे आपल्या फुटबॉल खेळाच्या भविष्याला मोठी चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. बॉलीवूडचे दिग्गज सेलिब्रेटी, फुटबॉलपटू, राजकीय नेते आणि क्रिकेटर्सही मेस्सीला चिअर्स करण्यासाठी वानखेडेवर पोहोचले. पण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मेस्सीला मैदानात भेटला, तेव्हा अख्खं स्टेडियम सचिन आणि मेस्सीच्या घोषणेने दुमदुमले.
सचिनने मेस्सी याला 2011 वर्ल्डकपमधील त्याची 10 क्रमांकाची जर्सी गिफ्ट केली. मेस्सीने सचिनला वर्ल्डकप जिंकलेला फुटबॉल गिफ्ट केला. त्यानंतर मेस्सी हा फुटबॉलचा दिग्गज सुनील छेत्रीलाही भेटला. मेस्सीने त्यालाही त्याची स्वाक्षरी असलेली अर्जेंटिना संघाची जर्सी भेट दिली.