FIFA World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

FIFA World Cup : मेस्सी आणि इजिप्तच्या प्रशिक्षकांमध्ये राडा! ‘अँटी-रॅसिझम’ इशाऱ्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

'राउंड ऑफ १६' मधील अटीतटीच्या सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत मैदानावर तणाव

पुढारी वृत्तसेवा

FIFA World Cup 2026 : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्जेंटिनाने मंगळवारी इजिप्तविरुद्ध शानदार पुनरागमन करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-finals) धडक मारली. सामन्याच्या निर्धारित वेळेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अर्जेंटिनाचा संघ ०-२ असा मागे होता. मात्र, त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत तब्बल ३ गोल डागत अर्जेंटिनाने सामन्याचे चित्र पालटले. ७९ व्या मिनिटाला क्रिस्टियन रोमेरोने पहिला गोल केला, त्यानंतर अवघ्या ४ मिनिटांनी जादूगार मेस्सीने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. अखेर भरपाई वेळेत एन्झो फर्नांडिसने गोल करत अर्जेंटिनाच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले.

होसाम हसन आणि मेस्‍सीमध्‍ये उडाली शाब्दिक चकमक

या नाट्यमय विजयानंतर दोन्ही बाजूंचे खेळाडू कमालीचे भावूक झाले होते, तर दुसरीकडे पराभवामुळे इजिप्तच्या गोटात प्रचंड नाराजी होती. सामन्याच्या शेवटच्या गोंधळाच्या क्षणांमध्ये, इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन (Hossam Hassan) आणि मेस्सी यांच्यात मैदानाबाहेर (Touchline) शाब्दिक चकमक उडाली.

व्‍हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल

यावेळचा हसन यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मेस्सीसोबतच्या वादानंतर हसन यांनी फिफाचा 'अँटी-रॅसिझम' (वर्णद्वेष विरोधी) इशारा केला, ज्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. हा प्रकार पाहून मेस्सीही काही काळ अवाक झाला होता. शेवटी पंचांनी मध्यस्थी केली आणि मेस्सीच्या सहकाऱ्यांनी त्याला बाजूला नेत मैदानात परत आणले.

विश्वचषकातील एकही सामना पाहणार नाही: होसाम हसन

सामन्याची अंतिम शिटी वाजल्यानंतर कमालीचे निराश झालेले प्रशिक्षक होसाम हसन यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या संघावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. ते म्‍हणाले, "अर्जेंटिनाचा हा विजय पूर्णपणे अनपेक्षित आणि अयोग्य आहे. मी तुम्हाला वचन देतो, आज परत गेल्यावर मी या विश्वचषकातील एकही सामना पाहणार नाही, कारण यात कोणताही न्याय उरलेला नाही. हा माझा वैयक्तिक निषेध आहे. मी मायदेशी परतल्यावर हा वर्ल्ड कप अजिबात पाहणार नाही," असे हसन यांनी सामन्यानंतर सांगितले.

विजय मिळवण्याचा केवळ आमचा अधिकार होता

"विजय मिळवण्याचा आमचा अधिकार होता. मी आमच्या संघाला नशीबाने साथ दिली नाही असे म्हणणार नाही. आम्ही सन्मानाने बाहेर पडलो आहोत; पण या सामन्याचा निकाल बाह्य घटकांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. फिफा ज्या 'फेअर प्ले' आणि आदराच्या गोष्टी करते, त्यापासून हा निकाल खूप दूर आहे. आजच्या सामन्यात ना आदर दिसला ना फेअर प्ले."

मेस्सीने स्पर्धेत राहावे अशी त्यांची इच्छा

निकाल ठरवण्यात बाहेरील शक्तींचा हात असल्याचा आरोप करत हसन म्हणाले, "आम्ही गतविजेत्या संघापेक्षा (अर्जेंटिना) प्रत्येक बाबतीत सरस दिसत होतो. परंतु मैदानावरील अंतर्गत आणि मैदानावरील बाहेरील घटकांमुळे सामन्याचा निकाल बदलला. कदाचित त्यांना जागतिक विजेत्यांना या स्पर्धेत टिकवून ठेवायचे होते. मेस्सीने स्पर्धेत राहावे अशी त्यांची इच्छा असावी. फुटबॉलमध्ये कधीकधी तांत्रिक बाबींच्या पलीकडे जाणारे बाह्य घटक काम करतात. जागतिक विजेत्यांना प्रत्येक स्तरावर पाठिंबा मिळाला," असा गंभीर आरोप त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT