स्पोर्ट्स

Lionel Messi Controversy : 'आम्हाला काहीही फुकट मिळालेले नाही' : टीकाकारांच्या ‘वारजेंटिना’ दाव्यांवर लिओनेल मेस्सीचा पलटवार

रणजित गायकवाड

अटलांटा : या फिफा विश्वचषकात अर्जेंटिना संघाला पंचांकडून आणि फिफाकडून झुकते माप दिले जात असल्याच्या आरोपांना कर्णधार लिओनेल मेस्सीने सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि प्रतिस्पर्धी संघांकडून होत असलेल्या ‘वारजेंटिना’ (व्‍हीएआर तंत्रज्ञानाचा अर्जेंटिनाला फायदा होणे) या टीकेचा समाचार घेताना मेस्सीने, ‘आम्हाला काहीही फुकट मिळालेले नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या रोमहर्षक विजयानंतर टीकाकारांना उत्तर देताना मेस्सी म्हणाला, ‘गेल्या चार वर्षांत आम्ही जगातील सर्वोत्तम संघ राहिलो आहोत, हे कोणाला आवडो वा न आवडो. आम्ही सलग दोन वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. यावरून हेच सिद्ध होते की, आमची कामगिरी कोणताही योगायोग नाही आणि आम्हाला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळालेली नाही.’

या विश्‍वचषक स्‍पर्धेत अर्जेंटिनाने केप व्‍हर्डे, स्वित्झर्लंड आणि इजिप्तविरुद्ध अटीतटीचे सामने जिंकून आगेकूच केली. मात्र, स्वित्झर्लंडचे प्रशिक्षक मुरात याकिन आणि इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांनी पंचांच्या निर्णयांवर तीव्र आक्षेप घेतला होता. हसन यांनी तर ‘यंत्रणा मेस्सी आणि अर्जेंटिनाला मुद्दाम पाठिंबा देत असल्याचा’ गंभीर आरोप केला होता. यावर अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी पत्रकारांना ‘सोशल मीडियावरील गोष्टींवर जास्त विश्वास ठेवू नका,’ असा सल्ला दिला आहे. स्कालोनी यांच्या मते, आजच्या व्हीएआरच्या काळात पंचांकडून अशी उघड मदत मिळणे अशक्य आहे.

‘माल्विनस’ (फॉकलंड बेटे) वाद

इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी चाहत्यांनी दिलेला ‘फॉकलंड (माल्विनस) बेटे अर्जेंटिनाचीच आहेत’ असा वादग्रस्त राजकीय बॅनर हातात धरून जल्लोष केला. अर्जेंटिना आणि ब्रिटन यांच्यात या बेटांच्या सार्वभौमत्वावरून जुना वाद आहे. या कृत्यामुळे ब्रिटिश सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणाची फिफाद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, सामन्यात १-१ असा बरोबरीचा गोल करणाऱ्या एन्झो फर्नांडिसनेही मैदानावर कानाजवळ हात नेऊन टीकाकारांना ‘बोलत राहा’ असा टोला लगावणारा इशारा केला होता. या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर, डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाचा संघ आता रविवारी स्पेनविरुद्ध सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT