स्पोर्ट्स

Messi Becomes Billionaire : ‘मेस्सी’ बनला अब्जाधीश, ‘रोनाल्डो’नंतर ही कामगिरी करणारा जगातील दुसरा फुटबॉलपटू

रोनाल्डो 2023 मध्ये अब्जाधीश बनणारा पहिला फुटबॉलपटू

रणजित गायकवाड

न्यूयॉर्क : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी अधिकृतपणे अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. ‌‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स‌’च्या अहवालानुसार, ही ऐतिहासिक कामगिरी करणारा तो त्याचा दीर्घकालीन प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतरचा जगातील दुसराच फुटबॉलपटू ठरला आहे.

ब्लूमबर्गच्या विश्लेषणानुसार, 38 वर्षीय मेस्सीने 2007 पासून केवळ पगार आणि बोनसच्या माध्यमातून 700 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 521 दशलक्ष पौंड) पेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यानंतर कर रचना, बाजारपेठेतील चढ-उतार, जागतिक गुंतवणूक आणि विविध नामांकित ब्रँडस्‌‍च्या जाहिरातींमधून मिळालेला परतावा या सर्वांचा हिशेब करून मेस्सीची एकूण संपत्ती आता 1 अब्ज डॉलर्सच्या पार गेली आहे.

अल-नासर क्लबचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो 2023 मध्ये सौदी अरेबियामध्ये गेल्यानंतर अब्जाधीश बनणारा पहिला फुटबॉलपटू ठरला होता, आता इंटर मियामीचा कर्णधार मेस्सीनेही त्याच्याशी बरोबरी केली आहे. रोनाल्डोची संपत्ती मुख्यत्वे त्याच्या आक्रमक मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे वाढली असताना, मेस्सीचा अब्जाधीश बनण्याचा हा प्रवास अधिक संथ आणि सुनियोजित राहिला आहे. अमेरिका तसेच युरोपमधील निवडक ब्रँडस्‌‍सोबतच्या भागीदारीच्या जोरावर त्याने हे स्थान मिळवले आहे.

दरम्यान, मेस्सीने उत्तर अमेरिकन फुटबॉल आणि एकूणच तेथील लोकप्रिय संस्कृतीवर पाडलेला प्रभाव एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. अमेरिकेमध्ये मेस्सीच्या नावाने एका रस्त्याचे नामकरण करण्यात आले आहे. 2026 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, न्यू जर्सीमधील एका स्थानिक टाऊनशिपमधील रस्त्याला ‌‘लियो मेस्सी वे‌’ असे नाव देण्यात आले आहे. 2022 मध्ये कतार विश्वचषक जिंकून देणाऱ्या मेस्सीचे नाव आता अमेरिकेच्या भूगोलात कोरले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT