Lionel Messi India Tour 2025
कोलकाता: अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आहे. 'GOAT इंडिया टूर २०२५' साठी आज पहाटे तो कोलकाता येथे दाखल झाला आहे. मियामीहून दुबईमार्गे प्रवास करून तो कोलकातामध्ये पोहोचला आहे. विश्वचषक विजेत्या मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी विमानतळ परिसरात गर्दी केली होती.
कोलकातामधील हयात रीजन्सी हॉटेलच्या बाहेरही त्याचे चाहते मोठ्या संख्येने जमले आहेत. त्याच्या एका महिला चाहत्याने सांगितले की, "आमचे नुकतेच लग्न झाले आहे, पण मेस्सी येणार असल्याने आम्ही आमचा हनिमून प्लॅन रद्द केला आहे, कारण आम्हाला सर्वप्रथम मेस्सीला पाहायचे आहे. आम्ही त्याला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत आणि गेल्या १०-१२ वर्षांपासून त्याला फॉलो करत आहोत."
विमान उतरण्यापूर्वीच विमानतळावर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. एका चाहत्याने सांगितले की, "आम्ही दोन तासांपासून वाट पाहत आहोत. गरज पडल्यास, आम्ही चार ताससुद्धा वाट पाहू. आयुष्यात एकदाच मिळणारी ही संधी आम्ही गमावू शकत नाही," असे एका चाहत्याने एएनआयला सांगितले.
सॉल्ट लेक स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी आयोजकांनी ७८,००० जागा राखीव ठेवल्या आहेत. आज ४५ मिनिटांच्या कार्यक्रमात मेस्सी सहभागी होईल. तिकिटांची किंमत ७,००० पर्यंत आहे. मेस्सी कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या चार शहरांना भेट देणार आहे. तो मुख्यमंत्री, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे.