Lionel Messi 875 goals
मियामी : आधुनिक फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट लायोनेल मेस्सीने इंटर मियामी क्लबकडून खेळताना त्याने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतील 875 वा गोल नोंदवत एक ऐतिहासिक टप्पा गाठला. विशेष म्हणजे, हा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण आणि सर्वात कमी सामने खेळलेला खेळाडू ठरला आहे.
इंटर मियामीने लॉस एंजेलिस गॅलेक्सी संघावर 3-1 ने मिळवलेल्या विजयात मेस्सीने हा मैलाचा दगड पार केला. दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर पुनरागमन करताना मेस्सीने केवळ 45 मिनिटांच्या खेळातच आपली जादू दाखवली. त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला भेदत मारलेला अप्रतिम गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. हा त्याचा केवळ 1116 सामन्यांमधील 875 वा गोल ठरला, जो एक विश्वविक्रम आहे.
मेस्सीच्या या सोनेरी कारकिर्दीची सुरुवात 1 मे 2005 रोजी झाली होती, जेव्हा त्याने बार्सिलोनासाठी वयाच्या 17 व्या वर्षी आपला पहिला व्यावसायिक गोल केला होता. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास अर्जेंटिना, पीएसजी आणि आता इंटर मियामी असा सुरू आहे.
सर्वात कमी वयात, सर्वात कमी सामन्यांत पराक्रम
रोनाल्डोच्या विश्वविक्रमाकडे वाटचाल
सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत मेस्सी आता ख्रिस्तियानो रोनाल्डोपेक्षा (938 गोल) केवळ 63 गोलांनी मागे आहे.
मेस्सीने केवळ गोलच केले नाहीत, तर आपल्या कारकिर्दीत तब्बल 389 असिस्टस् (गोल करण्यासाठी मदत) देखील केले आहेत.
875 गोलांचा टप्पा पार केल्यानंतर आता 900 गोलांचे लक्ष्य त्याच्या नजरेच्या टप्प्यात आले आहे.
मेस्सीची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता, तो लवकरच 1000 गोलांचा अविश्वसनीय टप्पा गाठेल, अशी आशा जगभरातील फुटबॉल चाहते व्यक्त करत आहेत.