Lalit Modi IPL comeback | ‘आयपीएल’मध्ये ललित मोदींचे पुनरागमन?  
स्पोर्ट्स

Lalit Modi IPL comeback | ‘आयपीएल’मध्ये ललित मोदींचे पुनरागमन?

राजस्थान रॉयल्स खरेदी करण्याच्या शर्यतीत; लंडनमध्ये आज महत्त्वाची बैठक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जनक मानले जाणारे ललित मोदी पुन्हा एकदा या ग्लॅमरस लीगमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित मोदी राजस्थान रॉयल्स (आरआर) हा संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत असून, या संभाव्य व्यवहाराबाबत सोमवारी (दि.16) लंडनमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. हा व्यवहार 12 हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खरेदीसाठी 4 बड्या कंपन्या शर्यतीत

राजस्थान रॉयल्सची मालकी मिळवण्यासाठी सध्या चार मोठे गट उत्सुक आहेत. त्यामध्ये ललित मोदी हे एका अमेरिकन कंपनीसोबत भागीदारी करून बोली लावू शकतात. दुसर्‍या इच्छुक गटात आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमारमंगलम बिर्ला यांचे चिरंजीव आर्यमान बिर्ला हे अमेरिकन गुंतवणूकदार डेव्हिड ब्लिट्झर यांच्यासोबत मिळून संघ खरेदीसाठी उत्सुक आहेत. मँचेस्टर युनायटेडशी संबंधित असलेले ग्लेझर कुटुंबही या शर्यतीत आहे.आणखी एका मोठ्या अमेरिकन कंपनीनेही यात स्वारस्य दाखवले आहे. ही डील यशस्वी झाली, तर राजस्थान रॉयल्सच्या मालकी हक्कांत बदल पाहायला मिळेल.

ललित मोदींचा वादग्रस्त इतिहास

ललित मोदी हे 2008 ते 2010 या काळात आयपीएलचे पहिले चेअरमन आणि कमिशनर होते. मात्र, 2010 मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. मीडिया राईटस्मध्ये 125 कोटींचे कमिशन घेतल्याचा आणि दोन नवीन संघांच्या लिलावात गडबड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2010 मध्ये बीसीसीआयने त्यांना निलंबित केल्यानंतर, अंडरवर्ल्डच्या धमक्यांचे कारण देत ते लंडनला पळून गेले. सध्या त्यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि फेमा कायद्याच्या उल्लंघनाचे खटले सुरू आहेत.

आर.आर.ची सध्याची मालकी

मनोज बदाले (एमर्जिंग मीडिया व्हेंचर्स): 65 टक्के शेअर्स (सर्वात मोठे हिस्सेदार).

रेडबर्ड कॅपिटल : 15 टक्के शेअर्स.

फॉक्स कॉर्पोरेशन: 15 टक्के शेअर्स.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT