Australian Open 2025 | लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक  
स्पोर्ट्स

Australian Open 2025 | लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक

तीन मॅच पॉईंटस् वाचवत चो टीएन चेनवर रोमांचक विजय

पुढारी वृत्तसेवा

सिडनी; वृत्तसंस्था : अगदी शेवटच्या क्षणापर्यंत यशाचे पारडे इकडून तिकडे झुलत असताना भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने चायनीज तैपेईच्या चो टीएन चेनचा 86 मिनिटांच्या चुरशीच्या सामन्यात अगदी निसटता पराभव केला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता निर्णायक अंतिम फेरीत लक्ष्यचा सामना चून यी लिन किंवा युशी तनाका यांच्यापैकी एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध होईल. लक्ष्यची वर्षातील ही दुसरी अंतिम फेरी आहे.

दोन जागतिक अजिंक्यपद पदक विजेत्यांमध्ये झालेल्या या लढतीत, भारताचा अव्वल पुरुष एकेरी बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चो टीएन चेनचा पराभव केला. लक्ष्य सेन सध्या जागतिक क्रमवारीत 14 वा मानांकित आहे. सिडनी ऑलिम्पिक पार्क स्पोर्टस् सेंटर येथे झालेल्या या लढतीत लक्ष्यने तीन मॅच पॉईंटस् वाचवून 17-21, 24-22, 21-16 अशा फरकाने 86 मिनिटांत हा लक्षवेधी विजय मिळवला.

आठ सामन्यांतील चो टीएन चेनविरुद्ध लक्ष्यचा हा चौथा विजय आहे. चेनने पहिला गेम सहज जिंकला. लक्ष्य सेनने पहिल्या गेममध्ये नेटजवळ काही चुका केल्या. दुसर्‍या गेममध्ये मात्र, लक्ष्यने आपला खेळ सुधारला. अंतिम टप्प्यात लक्ष्यने तीन मॅच पॉईंटस् वाचवून हा सामना निर्णायक गेममध्ये नेला. लक्ष्यने निर्णायक गेममध्ये जोरदार सुरुवात करत 7-2 अशी आघाडी घेतली, भारतीय शटलरने 11-6 अशी मोठी आघाडी ब्रेकपर्यंत कायम ठेवली आणि सामन्यावरील आपली पकड ढिली न होऊ देता, अंतिम गेम जिंकून 2025 बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सीझनमधील आपली दुसरी अंतिम फेरी गाठली.

जेतेपदाची कसर भरून काढण्याचे आव्हान

लक्ष्यने हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवले होते आणि तसेच त्याने गेल्या आठवड्यात कुमामोटो मास्टर्ससह दोन उपांत्य फेरीचे सामने खेळले आहेत. मात्र, यादरम्यान जेतेपदाने त्याला सातत्याने हुलकावणी दिली असून ती कसर येथे भरून काढण्याचे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT