मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) जगतात रविवारी (दि. ३) एका अत्यंत मोठ्या व्यवहाराची अधिकृत घोषणा करण्यात आली. आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझीची मालकी आता दिग्गज उद्योगपती लक्ष्मी एन. मित्तल आणि आदित्य मित्तल यांच्या नेतृत्वाखालील मित्तल कुटुंबियांकडे सोपवण्यात आली आहे. या ऐतिहासिक खरेदीमध्ये 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांची देखील भागीदारी असून हा संपूर्ण व्यवहार सुमारे १.६५ अब्ज अमेरिकन डॉलर्सना (अंदाजे १५,६६० कोटी रुपये) पूर्ण झाला आहे.
या पुनर्रचित करारानुसार, राजस्थान रॉयल्समध्ये मित्तल कुटुंबियांचा ७५ टक्के इतका मोठा हिस्सा असणार आहे. अदर पूनावाला यांच्याकडे १८ टक्के भागीदारी असेल, तर उर्वरित ७ टक्के हिस्सा यापूर्वीचे मालक मनोज बदाले आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमकडे राहणार आहे. मनोज बदाले हे केवळ भागधारक म्हणून मर्यादित न राहता, संघाचा भूतकाळ आणि भविष्य यांच्यातील दुवा म्हणून काम पाहतील. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग फ्रँचायझीच्या पुढील वाटचालीस होणार आहे.
संघाच्या नव्या संचालक मंडळात लक्ष्मी एन. मित्तल, आदित्य मित्तल, वनिषा मित्तल-भाटिया, अदर पूनावाला आणि मनोज बदाले यांचा समावेश असेल. हा व्यवहार २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, यासाठी बीसीसीआय (BCCI), आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि भारतीय स्पर्धा आयोग (CCI) यांची अधिकृत मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
या व्यवहारावर भाष्य करताना लक्ष्मी मित्तल यांनी आपली भावना व्यक्त केली. मूळचे राजस्थानमधील सादुलपूर येथील असलेल्या मित्तल यांनी सांगितले की, "मला क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि माझे कुटुंबीय राजस्थानचे असल्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होण्यापेक्षा दुसरा मोठा आनंद असू शकत नाही."
आदित्य मित्तल यांनी संघाच्या वारशाबद्दल समाधान व्यक्त केले. "राजस्थान रॉयल्स ही नवीन गुणवत्ता शोधण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा विचार मला अधिक भावतो. आम्ही जगातील सर्वोत्तम प्रतिभेला संधी देऊन या संघाचा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहोत," असे त्यांनी नमूद केले.
यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या अदर पूनावाला यांनी आता राजस्थान रॉयल्सच्या माध्यमातून आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. आदित्य मित्तल यांच्यासोबत या गुंतवणुकीत सहभागी होताना आपल्याला आनंद होत असल्याचे पूनावाला यांनी सांगितले. राजस्थान रॉयल्स ही एक मजबूत वारसा असलेली फ्रँचायझी असून तिच्या प्रगतीसाठी आपण उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजस्थान रॉयल्सकडे केवळ आयपीएलमधीलच संघ नाही, तर दक्षिण आफ्रिकेतील 'पार्ल रॉयल्स' आणि कॅरेबियन प्रीमियर लीग मधील 'बार्बाडोस रॉयल्स' या संघांचीही मालकी आहे. या मोठ्या व्यवहारामुळे रॉयल्सचे जागतिक क्रीडा क्षेत्रातील स्थान अधिक भक्कम होणार आहे. यापूर्वी अमेरिकेतील एका कंपनीने १.६३ अब्ज डॉलर्सची बोली लावली होती, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो व्यवहार पूर्ण होऊ शकला नव्हता. अखेर भारतीय उद्योगपतींच्या या भागीदारीने राजस्थान रॉयल्सच्या एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.