Fifa World Cup 2026 | निसर्गाच्या वादळानंतर घोंघावले एम्बापेचे ‘वादळ’ 
स्पोर्ट्स

Fifa World Cup 2026 | निसर्गाच्या वादळानंतर घोंघावले एम्बापेचे ‘वादळ’

विजांचा कडकडाट, वादळामुळे दोन तासांचा खेळ वाया

पुढारी वृत्तसेवा

फिलाडेल्फिया; वृत्तसंस्‍था : फिलाडेल्फियामध्ये आलेल्या भीषण वादळावर आणि इराकच्या आव्हानावर मात करत फ्रान्सने फिफा विश्वचषक स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम ठेवला. कर्णधार किलियन एम्बापेच्या दोन धडाकेबाज गोल्सच्या जोरावर फ्रान्सने इराकचा ३-० असा धुव्वा उडवला. या सलग दुसऱ्या विजयासह फ्रान्सने एक सामना शिल्लक असतानाच बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दिदिएर डेशचॅम्प्स यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या फ्रान्सने आक्रमक धोरण स्वीकारले. खेळाच्या पहिल्या हाफमध्ये किलियन एम्‍बापेेने २२ यार्डांवरून एक अप्रतिम, वेगवान फटका मारत फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, मध्यंतराच्या वेळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह वादळामुळे सामना तब्बल दोन तास थांबवावा लागला. विश्वचषकाच्या इतिहासातील हा पहिलाच हवामानविषयक मोठा व्‍यत्‍यय ठरला.

सामना पुन्हा सुरू झाल्यावर फ्रान्सने खेळावरील पकड सैल होऊ दिली नाही. इराकच्या बचावात्मक चुकांचा फायदा घेत एम्‍बापेने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. यासह एम्‍बापेचे या विश्वचषकातील एकूण ४ गोल झाले असून, विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल करणाऱ्या मेस्सीच्या १८ गोलच्या विक्रमापासून तो आता अवघा दोन गोल दूर आहे. या सामन्यात विंगर ओस्मान डेम्बेलेने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपल्या २० व्या सामन्यात पहिला ऐतिहासिक गोल झळकावला.

अल्जेरियाने जॉर्डनला नमवले

कॅलिफोर्निया : फिफा विश्वचषक स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या जॉर्डन संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. कॅलिफोर्निया येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात अल्जेरियाने दुसऱ्या हाफमध्ये जोरदार पुनरागमन करत जॉर्डनचा २-१ असा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये ३६ व्या मिनिटाला निझार अल रश्दानने जॉर्डनला १-० अशी अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. त्‍यानंतर अल्जेरियातर्फे ६९ व्या मिनिटाला नाधिर तर ८२ व्या मिनिटाला गोइरीने गोल करत विजय मिळवून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT