स्पोर्ट्स

Kumar Sangakkara : ‘दु:ख, चीड आणि वेदना’.. संगकाराचा संताप, श्रीलंकेच्या चुकांच्या ओढले ताशेरे

Sri Lanka cricket criticism : २०१४ मध्ये विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर, सलग पाचव्यांदा श्रीलंकेला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले आहे.

रणजित गायकवाड

कोलंबो : २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या श्रीलंकेचे या स्पर्धेतील आव्हान बुधवारी (दि. २५) संपुष्टात आले. आर. प्रेमदासा स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकाराने आपला संताप व्यक्त केला आहे. १६९ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेचा संघ अवघ्या १०७ धावांत गारद झाला. सुपर-८ फेरीतील हा त्यांचा सलग दुसरा पराभव असून, या फेरीतून बाहेर पडणारा श्रीलंका हा पहिला संघ ठरला आहे.

२०१४ मध्ये विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर, सलग पाचव्यांदा श्रीलंकेला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले आहे. संगकाराने या अपयशानंतर अत्यंत तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. २००९ ते २०१४ या श्रीलंकेच्या सुवर्णकाळात संगकारा संघाचा अविभाज्य भाग होता. त्या काळात संघाने सलग चार वेळा उपांत्य फेरी गाठली होती, ज्यात दोन वेळा उपविजेतेपद आणि एकदा विश्वविजेतेपदाचा समावेश होता.

'दु:ख, संताप आणि वेदना'

आपल्या भावना व्यक्त करताना संगकाराने ट्विट केले की, "सध्या सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. चाहते हताश आणि संतप्त आहेत. खेळाडूंनाही या पराभवाच्या वेदना होत आहेत. मी अशा परिस्थितीतून गेलो असल्याने मला खेळाडूंच्या मानसिकतेची जाणीव आहे, हे नक्कीच सोपे नाही."

बदलत्या क्रिकेटशी जुळवून घेण्याचे आवाहन

केवळ सहानुभूती न दाखवता संगकाराने संघाच्या वारंवार होणाऱ्या चुकांवर कडक शब्दांत टीका केली. तो म्हणाला, "देशाचे आणि जनतेचे प्रतिनिधित्व करणे ही एक मोठी जबाबदारी आणि सन्मान आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी आता सर्व स्तरांवर काम करण्याची गरज आहे. जागतिक क्रिकेट वेगाने बदलत असताना आपण त्याच जुन्या चुका करून वेगळ्या निकालाची अपेक्षा करू शकत नाही. आपण आधुनिक क्रिकेटशी जुळवून घेण्यात अपयशी ठरलो आहोत आणि हीच आपली सर्वात मोठी घसरण आहे."

फलंदाजीची सातत्याने होणारी पडझड

गट साखळीत ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय वगळता संपूर्ण स्पर्धेत श्रीलंकेच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. झिम्बाब्वेविरुद्ध पराभव पत्करावा लागूनही संघाने सुपर-८ मध्ये धडक मारली होती. मात्र, सुपर-८ मध्ये इंग्लंडविरुद्ध १४५ धावांचा पाठलाग करताना त्यांचा डाव ९५ धावांवरच आटोपला होता आणि आता न्यूझीलंडविरुद्धही फलंदाजीच्या त्याच कमकुवतपणाचा फटका त्यांना बसला.

गट २ मधील समीकरणे

न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला असला, तरी त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. त्यांना शुक्रवारी (दि. २६) बलाढ्य इंग्लंडला पराभूत करावे लागेल. जर न्यूझीलंडचा पराभव झाला, तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी मिळू शकते, पण त्यांना आपल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT