नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ‘जहाँ मॅटर बडा, वहाँ कोहली खडा...’ या समजुतीची प्रचिती पुन्हा एकदा आली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संघ 3 बाद 26 असा अडचणीत असताना कोहलीने कृणालला साथीला घेत संघाला विजयी मार्गावर आणले. विराटने 51, तर कृणाल पंड्याने 73 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या 119 धावांच्या भागीदारीमुळे ‘आरसीबी’ने दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेटस्नी विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर उडी मारली.
रविवारच्या दुसर्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची सुरुवात खराब झाली. त्यांचे 3 फलंदाज 26 धावांत तंबूत परतले. अक्षर पटेलने दुहेरी धक्का देताना जेकब बेथेल (12) आणि देवदत्त पडिक्कल (0) यांना एकाच षटकात बाद केले. कर्णधार रजत पाटीदार (6) धावचित झाल्याने संघाच्या अडचणीत भर पडली. याचा परिणाम धावगतीवर होऊन पॉवर प्लेमध्ये फक्त 35 धावा झाल्या.
पण चेस मास्टर विराट कोहली मैदानात असल्यामुळे ‘आरसीबी’ फॅन्सना चिंता नव्हती. यावेळी विराटला कृणाल पंड्याने अप्रतिम साथ दिली. दोघांनी आधी परिस्थिती सावरली, नंतर ती आटोक्यात आणली आणि त्यावर विजय मिळवला. दोघांनी अत्यंत संयमाने खेळी करून संघाला विजयी केले. परंतु, विजयाच्या उंबरठ्यावर असताना विराट कोहली षटकार मारताना बाद झाला. कोहलीने 47 चेंडूंत 51 धावा केल्या. दोघांनी 119 धावांची भागीदारी केली. त्यानंतर टीम डेव्हिड (19) आणि कृणाल पंड्या यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तत्पूर्वी, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीकडून अभिषेक पोरेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी चांगली सुरुवात केली; पण पोरेलला चौथ्या षटकात जोश हेझलवूडने बाद केले. त्याने 11 चेंडूंत 28 धावांची खेळी केली. त्यानंतर पुढच्याच षटकात करुण नायर 4 धावांवर बाद झाला. नंतर डू प्लेसिस आणि के. एल. राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण डू प्लेसिसला 10 व्या षटकात 22 धावांवर कृणाल पंड्याने बाद केले. अक्षर पटेलही फार काही करू शकला नाही. त्याला हेझलवूडने 15 धावांवर त्रिफळाचीत केले. सातत्याने विकेट जात असल्याने दिल्लीला धावगती वाढवतादेखील आली नाही.
त्यातच 17 व्या षटकात दिल्लीला दुहेरी धक्के बसले. के. एल. राहुल आणि आशुतोष शर्मा यांना भुवनेश्वर कुमारने बाद केले. के. एल. राहुलने 39 चेंडूंत 41 धावांची खेळी केली. आशुतोष 2 धावांवर बाद झाला. तरी शेवटी ट्रिस्टन स्टब्सने आक्रमक खेळ केला. त्यामुळे संघाला 150 धावांचा टप्पा पार करता आला; पण शेवटच्या षटकात विपराज निगम 12 धावांवर त्रिफळाचीत झाला, तर स्टब्सलाही भुवनेश्वरने बाद कले. स्टब्सने 18 चेंडूंत 34 धावांची खेळी केली. दिल्लीने 20 षटकांत 8 बाद 162 धावा केल्या. बेंगळुरूकडून भुवनेश्वर कुमारने 3 विकेटस् घेतल्या. तसेच जोश हेझलवूडने 2 विकेटस् घेतल्या, तर यश दयाल आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.