नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कोलकाता नाईट रायडर्सने ‘आयपीएल 2025’मध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी विजय मिळवून पॉईंट टेबलचे गणित रंजक बनवले आहे. फाफ ड्युप्लेसिस व अक्षर पटेल ही जोडी मैदानावर असेपर्यंत दिल्ली कॅपिटल्सला विजयाची आशा होती; पण सुनील नारायणने त्याच्या दोन षटकांत 3 विकेटस् घेऊन मॅच फिरवली आणि त्यानंतर वरुण चक्रवर्तीने सलग दोन विकेटस् घेऊन मॅच ‘केकेआर’च्या बाजूने पूर्णपणे झुकवली. या पराभवामुळे 14 गुणांसह दुसर्या क्रमांकावर पोहोचायचे स्वप्न बघणारा दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत 12 गुणांवरच मधल्यामध्ये लटकला आहे. (DC vs KKR)
‘केकेआर’च्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला दुसर्याच चेंडूवर धक्का बसला. अभिषेक पोरेल (4) अनुकूल रॉयच्या गोलंदाजीवर बाद झाला. करुण नायरला (15) शांत ठेवण्यात वैभव अरोराला यश आले. फॉर्मात असलेल्या के. एल. राहुलला (7) अती घाई नडली अन् तो धावचित झाल्याने दिल्लीची अवस्था 3 बाद 60 अशी झाली. फाफ ड्युप्लेसिस व अक्षर पटेल ही जोडी मैदानावर उभी राहिली. एक हात दुखत असूनही अक्षर वेदनेसह खेळला आणि त्याने फाफसह 42 चेंडूंत 76 धावांची महत्त्वाची भागीदारी करून मॅच दिल्लीच्या बाजूने झुकवली. (DC vs KKR)
14 व्या षटकात सुनील नारायणच्या गोलंदाजीवर अक्षर झेलबाद झाला. त्याने 23 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 43 धावा केल्या. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टिस्टन स्टब्सचा (1) त्रिफळा उडवून नारायणने ‘केकेआर’ला मोठे यश मिळवून दिले. फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी दिल्लीने विपराज निगमला पुढच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. दिल्लीला विजयासाठी 30 चेंडूंत 59 धावा करायच्या होत्या आणि हे लक्ष्य पार करण्यासारखे होते.
नारायणने त्याच्या पुढच्या षटकात आणखी एक मोठी विकेट मिळवून दिली. फाफ 45 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 62 धावांवर झेलबाद झाला. शेवटच्या 3 षटकांत 46 धावा दिल्लीला करायच्या होत्या. हर्षितच्या 17 व्या षटकात 11 धावा आल्या.
वरुण चक्रवर्ती 18 वे षटक फेकण्यासाठी आला अन् आशुतोषने त्याला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला; पण चेंडू सरळ सुनील नारायणच्या हातात गेला आणि आशुतोषला 7 धावांवर माघारी जावे लागले. मिचेल स्टार्कला गोल्डन डकवर पाठवून वरुणने सलग दोन चेंडूंवर दोन धक्के दिले. विपराजने 19 व्या षटकात 4, 6, 2 अशी फटकेबाजी करून दिल्लीला शर्यतीत ठेवले. 6 चेंडूंत 25 धावा करायच्या होत्या या षटकात 10 धावाच आल्या. विपराज पाचव्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने 19 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 38 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला 9 बाद 190 धावांवर समाधान मानावे लागले आणि ‘केकेआर’ने 14 धावांनी मॅच जिंकली.
तत्पूर्वी, केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 204 धावा केल्या. सुनील नारायण (27), रहमानउल्ला गुरबाज (26), अजिंक्य रहाणे (26) यांनी चांगली सुरुवात केली. वेंकटेश अय्यर (7) पुन्हा अपयशी ठरला असला तरी अंगक्रीश रघुवंशी (44) व रिंकू सिंग (36) यांचा फॉर्म परतणे संघासाठी शुभसंकेत आहे. या जोडीने 60 धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेलच्या 17 धावांनी संघाला दोनशेपार पोहोचवले.