नवी दिल्ली : आयपीएल स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेल्या सनरायझर्स हैदराबादने जाता जाता आपला जलवा पुन्हा दाखवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड (76) आणि हेन्रिक क्लासेन (नाबाद 105) यांनी मैदान दणाणून सोडले. हैदराबादने कोलकातासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले. हे यंदाच्या हंगामातील दुसर्या क्रमांकाचे सर्वोच्च लक्ष्य ठरले. गतविजेता केकेआरला याचा पाठलाग झेपला नाही, 168 धावांत त्यांचा खेळ खल्लास झाला आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेचा पराभवासह निरोप घेतला.
हैदराबादच्या 279 धावांचे टार्गेट गाठण्यासाठी कोलकाताकडून क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेन सलामीला फलंदाजीस उतरले. डी कॉकची सुरुवात धिमी झाली, पण नरेनने आक्रमण केले होते. पण चौथ्या षटकात नरेनला जयदेव उनाडकटने त्रिफळाचीत केले. नरेनने 16 चेंडूंत 31 धावांची खेळी केली. नंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला 6 व्या षटकात उनाडकटनेच अभिषेक शर्माच्या हातून झेलबाद केले. रहाणेने 8 चेंडूंत 15 धावा केल्या. पुढच्या षटकात इशान मलिंगाने 9 धावांवर डी कॉकला बाद केले. रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांना 8 व्या षटकात हर्ष दुबेने लागोपाठच्या चेंडूवर बाद करत धक्का दिला.
रिंकू सिंग 9 धावांवर आणि रसेल पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले. त्यामुळे 5 बाद 70 धावा अशी अवस्था कोलकाताची झाली होती. त्यातच फॉर्ममध्ये असणार्या अंगक्रिश रघुवंशीचा अडथळाही 14 धावांवर मलिंगाने दूर केला. रमणदीप सिंग 14 व्या षटकात हर्ष दुबेने त्रिफळाचीत केले, पण नंतर मनीष पांडे आणि हर्षित राणा यांनी अर्धशतकी भागीदारी करत पराभवाचे अंतर कमी केले, पण 18 व्या षटकात कोलकाताला सलग दोन चेंडूंत दोन धक्के बसले. मनीष पांडेला 37 धावांवर जयदेव उनाडकटने बाद केले. तसेच वैभव अरोरा शून्यावर धावबाद झाला. अखेर 19 व्या षटकात हर्षित राणा 34 धावांवर बाद झाला. यासह कोलकाताचा डावही संपला. हैदराबादकडून जयदेव उनाडकट, इशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 3 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 3 बाद 278 धावा केल्या. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने 39 चेंडूंत नाबाद 105 धावांची खेळी केली. त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. ट्रॅव्हिस हेडने 40 चेंडूंत 76 धावांची खेळी केली. यात त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. अभिषेक शर्माने 16 चेंडूंत 32 धावा केल्या, तर इशान किशनने 20 चेंडूंत 29 धावा केल्या. अनिकेत वर्माने 6 चेंडूंत 12 धावा केल्या. कोलकाताकडून सुनील नरेनने 2 विकेटस् घेतल्या. तसेच वैभव अरोराने 1 विकेट घेतली.