KL Rahul retirement
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल सध्या आपल्या भविष्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. "निवृत्तीची वेळ येईल तेव्हा मी अजिबात ओढाताण करणार नाही," असे खळबळजनक विधान राहुलने केले आहे. निवृत्तीचा विचार मनात आल्याची कबुली देतानाच, खेळापलीकडेही आयुष्य असल्याचे त्याने स्पष्ट केले.
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याच्या यूट्यूब चॅनेलवर राहुलने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्याने करिअर, वारंवार होणाऱ्या दुखापती आणि मानसिक संघर्षावर भाष्य केले.
निवृत्तीच्या निर्णयाबाबत बोलताना ३३ वर्षीय राहुल म्हणाला, "मी निवृत्तीचा विचार केला आहे आणि मला वाटत नाही की तो निर्णय घेणे माझ्यासाठी फार कठीण असेल. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल, तर जेव्हा वेळ येईल तेव्हा ती येईलच. उगाच करिअर लांबवत नेण्यात काही अर्थ नसतो. अर्थात, माझी निवृत्ती अजून काही काळ लांब असली, तरी मी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे."
तो पुढे म्हणाला की, "स्वतःला खूप मोठे समजणे थांबवले की निर्णय सोपे होतात. आपल्या देशात आणि जगात क्रिकेट कधीच थांबणार नाही, ते सुरूच राहील. आयुष्यात कुटुंबासोबत वेळ घालवणे यासारख्या इतरही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विशेषतः बाबा झाल्यापासून माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे."
आपल्या कारकिर्दीतील कठीण काळाबद्दल बोलताना राहुलने दुखापतींचा उल्लेख केला. "वारंवार होणाऱ्या दुखापतींशी लढणे हे शारीरिक वेदनांपेक्षा जास्त मानसिक युद्ध असते. जेव्हा तुम्ही वारंवार दुखापतग्रस्त होता, तेव्हा तुमचे मन सांगू लागते की 'आता पुरे झाले.' अशा वेळी स्वतःला सावरणे हे सर्वात मोठे आव्हान असते," असे तो म्हणाला.
निवृत्तीच्या चर्चा सुरू असल्या तरी राहुल सध्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. तो गुरुवारी मोहाली येथे पंजाबविरुद्ध होणाऱ्या कर्नाटकच्या महत्त्वपूर्ण रणजी ट्रॉफी सामन्यात मैदानात उतरणार आहे.
केएल राहुलने आतापर्यंत भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे:
कसोटी: ६७ सामन्यात ४,०५३ धावा.
वनडे: ९४ सामन्यात ५०.९ च्या सरासरीने ३,३६० धावा.
टी-२०: ७२ सामन्यात २,२६५ धावा.