केएल राहुल किंवा हार्दिक पंड्या वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतात.  File Photo
स्पोर्ट्स

IND vs SL : केएल राहुल कॅप्टन होणार! श्रीलंकेविरुद्ध रोहित-कोहली-बुमराहला विश्रांती

कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पंड्याच्या नावाचाही समावेश

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : KL Rahul Team India : भारताचा युवा क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. जुलैच्या अखेरीस टी-20 मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून सुरू होईल. पीटीआयच्या वृत्तानुसार, नियमित वनडे कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे केएल राहुल किंवा हार्दिक पंड्या या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतात.

रोहितने मागितला ब्रेक

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही आयपीएलच्या सुरुवातीपासूनच सातत्याने खेळत आहेत. 37 वर्षीय रोहितने सहा महिने ब्रेक घेतलेला नाही. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून तो सतत खेळला आहे. यात अफगाणिस्तानविरुद्ध टी-20, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका, आयपीएल आणि टी-20 विश्वचषक यांचा समावेश आहे.

कोहली लंडनमध्ये

किंग कोहलीही सध्या आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका जुलैच्या शेवटच्या आठवड्यात खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत कोहलीही संघाचा भाग नसण्याची दाट शक्यता आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मैदानात उतरतील

2025 मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान, पीसीबीने या स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीकडे पाठवले आहे. यात टीम इंडियाच्या सामन्यांचाही समावेश आहे. पण भारतीय संघ तिथे जाणार की नाही याबाबत सध्या काहीही निश्चित झालेले नाही. बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्धचे तीन एकदिवसीय सामने तयारीसाठी पुरेसे आहेत. यानंतर, पुढील काही महिने रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटीला प्राधान्य देतील कारण भारताला सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान दहा कसोटी खेळायच्या आहेत.

कर्णधारपदासाठी दोन मोठे दावेदार

रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यातून बाहेर पडला तर टीम इंडियामध्ये कर्णधारपदासाठी दोन मोठे दावेदार आहेत. यामध्ये केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांची नावे आघाडीवर आहेत. या दोन्ही खेळाडूंनी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे कर्णधारपद आधीच सांभाळले आहे आणि त्यांना आयपीएलमध्येही कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे.

राहुल-पंड्याचे रेकॉर्ड आश्वासक

केएल राहुलने आतापर्यंत 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 8 जिंकले आहेत. त्याचबरोबर चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, हार्दिक पंड्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. त्यातील दोन जिंकले आहेत. राहुलला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. तर पंड्याने टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये शेवटचे षटक टाकले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाच्या श्रीलंका दौ-याचे वेळापत्रक

टी-20 मालिका

27 जुलै : पहिला टी-20 सामना : संध्याकाळी 7 वाजता

28 जुलै : दुसरा टी-20 सामना : संध्याकाळी 7 वाजता

30 जुलै : तिसरा टी-20 सामना : संध्याकाळी 7 वाजता

वनडे मालिका

2 ऑगस्ट : पहिला वनडे सामना : दुपारी 2:30 वाजता

4 ऑगस्ट : दुसरा वनडे सामना : दुपारी 2:30 वाजता

7 ऑगस्ट : तिसरा वनडे सामना : दुपारी 2:30 वाजता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT