भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील दुसरी कसोटी लढत १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाणार आहे. हा सामना जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्यावर भारतीय संघाचे लक्ष केंद्रित असेल. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघाला एक डाव आणि १४० धावांनी पराभूत केले होते.
पहिल्या सामन्यात केएल राहुलने शानदार अशी १०० धावांची खेळी केली होती. आता दुसऱ्या कसोटीत त्याच्याकडे एक खास विक्रम नोंदवण्याची संधी आहे.
जर केएल राहुलने वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आणखी १११ धावा केल्या, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये आपले ४००० धावा पूर्ण करेल. यासोबतच तो माजी धडाकेबाज सलामीवीर मुरली विजय याला मागे टाकेल. मुरली विजयने भारतीय संघासाठी ६१ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३९८२ धावा केल्या होत्या.
केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये २०१४ साली पदार्पण केले. तेव्हापासून तो संघाचा एक महत्त्वाचा दुवा बनलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत संघासाठी ६४ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३८८९ धावा केल्या आहेत, ज्यात त्यांच्या बॅटमधून ११ शतके आणि १९ अर्धशतके निघाली आहेत. या दरम्यान, त्यांची सर्वोच्च धावसंख्या १९९ धावा इतकी आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल यांच्यासह रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल यांनी शतके झळकावली होती. या खेळाडूंमुळेच भारतीय संघाने पहिल्या डावात ४४८ धावा करून डाव घोषित केला होता. याउलट वेस्टइंडीज संघाने पहिल्या डावात केवळ १६२ धावा केल्या होत्या. यामुळे भारताला पहिल्या डावाच्या आधारावर २८६ धावांची मोठी आघाडी मिळाली, जी विजयात महत्त्वपूर्ण ठरली. दुसऱ्या डावात वेस्टइंडीजचा संघ फक्त १४६ धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने एक डाव आणि १४० धावांनी हा सामना आपल्या नावावर केला. दुसऱ्या डावात जडेजाने चार बळी घेतले. याच उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.