पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या लिलावात वेंकटेश अय्यरला तब्बल 23.75 कोटी रुपयांना खरेदी केले. सुरुवातीच्या काही अपयशी डावांनंतर अखेर अय्यरने आपली प्रतिभा दाखवत सनराजर्स हैद्राबाद विरुद्ध 29 चेंडूत 60 धावांची तडाखेबंद खेळी केली आणि KKR साठी मजबूत अशी 200 धावसंख्या उभारून दिली. यानंतर त्याच्यावर आयपीएलमधील महागड्या खेळाडूपैकी एक असल्यामुळे टीकेची झोड उठत होती. आता त्याने यावरचे मौन सोडत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने म्हटले आहे की, "पैशाचा खेळावर परिणाम होत नाही, तसेच पैसे तुम्ही कसे खेळणार ते ठरवत नाही." असे उत्तर दिले आहे.
प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करण्याची अपेक्षा चुकीची असल्याचे अय्यरने स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, "एकदा IPL सुरू झाल्यानंतर तुम्ही 20 लाखांना विकले गेले असाल अथवा 20 कोटींना, त्याने तुमच्या खेळावर फरक पडत नाही. पैसे ठरवत नाहीत तुम्ही कसे खेळणार?."
अय्यरने आपल्या सहकाऱ्याचे कौतुक करत सांगितले, "आमच्याकडे अंगकृष रघुवंशीसारखा युवा खेळाडू आहे, जो उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. मी सर्वाधिक महागडा खेळाडू आहे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक सामन्यात मीच चमकले पाहिजे. संघाच्या गरजेनुसार माझी भूमिका बदलते."
IPL मध्ये मोठ्या किमतीचा दबाव असतो का, या प्रश्नावर तो म्हणाला, "हो, दबाव आहे, पण तो पैशाचा नाही. मला संघाच्या यशात योगदान द्यायचे आहे, हीच खरी जबाबदारी आहे."
वेंकटेश अय्यरने SRH कर्णधार पॅट कमिन्सच्या एका षटकात 20 धावा काढत धुलाई केली. मात्र, कोणता गोलंदाज समोर आहे याकडे लक्ष न देता फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करतो, असे त्याने सांगितले. "आमच्याकडे रिंकू, रसेल, रामनदीपसारखे विस्फोटक खेळाडू आहेत. त्यामुळे आम्ही शेवटच्या षटकांत कोणत्याही संघाच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवू शकतो," असे अय्यरने आत्मविश्वासाने सांगितले.