पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाची (Chetan Sakariya ) उमरान मलिकच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून निवड केली आहे. आयपीएल 2025 हंगामाच्या आधी मलिकला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. या घटनेचे वृत्त 'क्रिकबज'ने दिले आहे.
उमरान मलिकला गतविजेत्या संघाने 75 लाखांमध्ये खरेदी केले होते. दुसरीकडे, 27 वर्षीय सकारिया गेल्या हंगामात केकेआर संघात होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर तो मोठ्या लिलावात न विकला गेल्यानंतर आता पुनश्च केकेआरकडून त्याला संधी मिळाली आहे. त्याला 75 लाखांमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे.
सकारियाने 2021 ते 2023 दरम्यान तीन हंगामांमध्ये 19 आयपीएल सामने खेळले असून, त्यात त्याने 8.43 च्या इकॉनॉमीने 20 बळी घेतले आहेत. त्याने राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते आणि नंतर 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला. एकूण टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 7.69 च्या इकॉनॉमीने 65 बळी घेतले आहेत.