स्पोर्ट्स

Khelo India Para Games : महाराष्ट्राचा ‘सुवर्ण’ षटकार

Arun Patil

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पॅरिस ऑलिम्पिक (Khelo India Para Games) स्पर्धेत पात्रता सिद्ध केलेल्या दिलीप गावितसह भाग्यश्री जाधव, अभिषेक जाधव, अकुताई उलभगत, गीता चव्हाण आणि कोल्हापूरची बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सुवर्णपदकांची कमाई केली. या 'सुवर्ण' षटकाराने महाराष्ट्राने आपली सर्वसाधारण विजेतेपदाची आगेकूचही कायम राखली. खेळाडूंचा उत्साह आणि त्यांची जिंकण्याची जिद्द पाहिल्यावर धडधाकट खेळाडूदेखील प्रेरित होतील, अशी कामगिरी हे खेळाडू करत आहेत.

पुण्याच्या मीनाक्षी जाधवने एकाच दिवशी दोन ब्राँझपदकांची कमाई केली. पहिल्या दिवशी 200 मीटर शर्यतीत तिसरे स्थान मिळविणार्‍या ऋतुजाने आज टू-38/44 प्रकारात 400 मीटर शर्यतीतही ब्राँझपदक मिळविले. भाग्यश्री, दिलीप आणि गीता यांच्या सुरेख कामगिरीमुळे महाराष्ट्राने अ‍ॅथलेटिक्समध्ये आज दिवसभरात आठ पदकांची कमाई केली. नाशिकच्या दिलीपने पुरुषांच्या टी 47 प्रकारात 400 मीटर शर्यत जिंकताना 51.22 सेकंद अशी वेळ दिली. स्पर्धेतील हे त्याचे दुसरे पदक ठरले. यापूर्वी पहिल्या दिवशी तो 100 मीटर शर्यतीत रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. अभिषेकने टी 35 प्रकारातून 200 मीटर शर्यत 29.92 सेकंदात जिंकताना सुवर्णयश मिळविले.

अकुताईने थाळीफेक प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. मात्र, आज गुणांच्या आघाडीची पडताळणी झाल्यावर अकुताईचे रुपेरी यश सोन्यात परावर्तित झाले. मीनाक्षीने एफ 56-57 या प्रकारात फेक करत लागोपाठ दोन ब्राँझपदके मिळविली. प्रथम भालाफेक प्रकारात मीनाक्षीने 12.35 मीटर फेक केली, तर गोळाफेक प्रकारात तिने 5.16 मीटर फेक करून तिसरे स्थान मिळविले.

भाग्यश्री चमकली (Khelo India Para Games)

अ‍ॅथलेटिक्समध्ये भाग्यश्रीचे यश सर्वात उजवे ठरले. सलग दुसर्‍या दिवशी भाग्यश्रीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. नांदेडच्या भाग्यश्रीने महिलांच्या गोळाफेक प्रकारात एफ 32, 33, 34 विभागात 7.60 मीटर फेक करताना सुवर्णपदक मिळविले. भाग्यश्री पहिल्या दिवशी भालाफेक प्रकारातही सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. हे यश अवर्णनीय असून, भविष्यात कारकीर्द घडवताना हा सुवर्ण अनुभव निश्चित कामी येईल, असे भाग्यश्री म्हणाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT